Even at the age of eighty-five, Avaliya was running a bullet in Rubab | पंच्याऐंशीव्या वर्षीही रुबाबात बुलेट चालविणारा अवलिया

पंच्याऐंशीव्या वर्षीही रुबाबात बुलेट चालविणारा अवलिया

ठळक मुद्देपंच्याऐंशीव्या वर्षीही रुबाबात बुलेट चालविणारा अवलिया तरुणाईत कुतूहल : अनेकांना होतोय सेल्फी घेण्याचा मोह

शंकर पोळ/कोपर्डे

हवेली : बुलेटसोबत फोटोसेशन करण्याचाही नवा ट्रेण्ड सुरू झाला आहे. तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझ मोठी असली तरी बुलेट चालविणे तितके सोपे नाही याचे कारण म्हणजे बुलेटचे अतिरिक्त वजन आणि गाडीचा आकार. हौस म्हणून बुलेट घेणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी नंतर ती चालविणे झेपत नाही म्हणून घरासमोर शोपिस झालेल्या बुलेटची संख्या व एक दोन वर्षांत विकून टाकणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. या सगळ्याला छेद देत कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील अवलिया, प्रगतशील शेतकरी मारुती चव्हाण हे ८५ व्या वर्षी बुलेट चालवित आहेत.

तरुणाईत हा चर्चेचा विषय बनत आहे. चौऱ्याऐंशी वर्षाचे हे तरुण कित्तेक वर्षांपासून फक्त बुलेटची सवारीच करत आहेत. म्हणून असे म्हणता येईल की त्यांचा नादच करायचा नाही. विशेष म्हणजे एवढ्या वर्षात त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नाही. आजही ते त्याच दिमाखात आणि रुबाबात बुलेट चालवितात.

धोतर, तीन बटणी नेहरू आणि डोक्यावर पटका या पोषाखात असणाऱ्या दादांचा बुलेट चालवितांनाचा रुबाबदारपणा कॉलेज युवकांनाही लाजवेल असाच काहीसा त्यांचा अंदाज आहे. अलीकडच्या काही वर्षांत तरुणांमध्ये बुलेटची मोठी क्रेझ पाहण्यास मिळत आहे. तसे पाहिले तर बुलेटचा इतिहास जुना आहे. मात्र, त्या काळात बुलेटला मागणी कमी होती. बडे बागायतदार, उद्योजक वा राजकीय नेते मंडळींकडेच बुलेट दिसायची.

पूर्वी हलकी दुचाकी वाहने खरेदी करण्याकडे लोकांचा कल होता. त्या काळात मारुती चव्हाणांनी पुण्याच्या शोरूममधून बारा हजारांत बुलेट खरेदी केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी एवढ्या वर्षात बुलेट व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गाडी चालविली नाही. स्वकष्टाने व मेहनतीने कमावलेल्या पैशातून त्यांनी ही बुलेट घेतली होती. त्यामुळे त्याचे महत्त्व ते जाणतात. त्यांनी बुलेटची चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आहे. एक सुरात, शिस्तीत ते बुलेट चालवितात.

अगदी हत्तीची चाल बोलतात त्या रुबाबात ते बुलेट चालवतात. आजच्या बटनस्टार्टच्या जमान्यातही ते एका किकमध्ये बुलेट सुरू करतात. छोट्या दुचाकीला किक मारताना आजचे तरुण कंटाळा करताना दिसतात तिथे आजही हा चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण किक मारूनच बुलेट सुरू करतात. डोंगराळ भागात शेतातील खडतर रस्त्याने बुलेटवरूनचा प्रवास ते सहजरीत्या करतात. या वयातही ते ऊन, वारा, पाऊस या तीनही ऋतुंमध्ये बुलेटचाच प्रवास करतात. अपवाद वगळता एवढ्या वर्षात बस अथवा चारचाकीचा प्रवासदेखील त्यांनीे केलेला नाही. बुलेट हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

बाहेरगावी गेल्यानंतर खूप ठिकाणी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह तरुणांना होतो. शहरात, महाविद्यालय परिसरात तरुण-तरुणी त्यांना बुलेट चालविताना कुतूहलाने बघतात. या वयातही त्यांचा बुलेट चालवण्याचा अंदाज थक्क करणारा आहे. बुलेट चालवताना हिरोगिरी करणारे अनेक तरुण आपण पाहिले असतील, पण इतक्या वर्षात सेफ ड्रायव्हिंग करून एकही अपघात होऊ दिलेला नाही.

अलीकडच्या काही वर्षांत वाढते वय लक्षात घेऊन ते गर्दीच्या ठिकाणी बुलेट चालविण्याचे टाळतात. शेतात जाताना ते रुबाबात बुलेटवरच स्वार होतात. गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांची बुलेटची सवारी सुरू आहे.


मला बुलेटची आवड असल्याने मी गेल्या चाळीस वर्षांपासून बुलेट चालवितो. वयाच्या कारणाने लांबपल्ल्याचा आणि गर्दीचा प्रवास टाळतो. अजूनही अर्ध्या किकमध्ये माझी गाडी सुरू होते.
-मारुती चव्हाण,
कोपर्डे हवेली

Web Title: Even at the age of eighty-five, Avaliya was running a bullet in Rubab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.