कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रात पाच दिवस प्रवेश बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:21 IST2024-12-27T12:20:37+5:302024-12-27T12:21:11+5:30
कोयनानगर : कोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. मात्र, ३१ डिसेंबरच्या ...

कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रात पाच दिवस प्रवेश बंद
कोयनानगर : कोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. मात्र, ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोयना हेळवाक वनपरिक्षेत्रातील सर्व पर्यटनस्थळे २८ डिसेंबरपासून पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल एस. ए. जोपळे, एस. पी. गोडसे यांनी दिली.
वन्यजीव विभागाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सह्याद्री व्याघ्र राखीवमधील कोयना व हेळवाक वनपरिक्षेत्रात २८ डिसेंबर ते १ जानेवारी रोजी नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात जेवणावळी करण्यासाठी वनक्षेत्रात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी वन क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण, मद्यपान करणे, वणवा लावणे, शिकार करणे, गोंधळ करणे आदी अनुचित प्रकार करणाऱ्या संबंधितांवर तत्काळ वन्यजीव व वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
वनक्षेत्राकडे येणाऱ्या रस्त्यावर चेक पोस्ट लावून वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून जंगल क्षेत्रात रात्रगस्त ठेवण्यात येणार आहे. पर्यटक व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे.