सातारा: वाढे सोसायटीत ६० लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड; सचिवास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:08 IST2022-06-10T16:08:34+5:302022-06-10T16:08:58+5:30
सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात करून सुमारे ६० लाख रुपयांचा अपहार

सातारा: वाढे सोसायटीत ६० लाखांचा अपहार, लेखापरीक्षणात उघड; सचिवास अटक
सातारा : सातारा तालुक्यातील वाढे सोसायटीत सभासदांची फसवणूक आणि विश्वासघात करून सुमारे ६० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्याविरोधात गुन्हा नोंद असून सचिवाला अटक केली आहे. हा प्रकार लेखापरीक्षणात उघड झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी प्रमाणित लेखापरीक्षक दत्तात्रय जयसिंगराव पवार (रा. पारगाव खंडाळा) यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर सचिव राजेंद्र भानुदास चव्हाण (रा. फडतरवाडी, ता. सातारा) याच्यासह अन्य एकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
एप्रिल २०१६ पासून ३१ मार्च २०२० या कालावधीत वाढे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत हा प्रकार घडला आहे. स्वत:च्या लाभासाठी पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक खोट्या नोंदी केल्या, त्याचबरोबर रोख शिल्लक चुकीची दर्शवून कर्जदाराचा जमा बँकेत ठेवला नाही. स्वत:च्या लाभात ठेवून संस्था आणि सभासदांची ५९ लाख ९१ हजार ९७० रुपयांची फसवणूक करून विश्वासघात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, सोसायटीतील हा अपहार लेखापरीक्षणात समोर आला. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे तपास करीत आहेत.