साताऱ्यात टेस्लासह मोठ्या कंपन्यांची जागेची चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:29 IST2025-05-14T16:27:12+5:302025-05-14T16:29:25+5:30
राजकीय इच्छाशक्तीची गरज : जिल्ह्याला हवेत रोजगार निर्माण करणारे प्रकल्प

साताऱ्यात टेस्लासह मोठ्या कंपन्यांची जागेची चाचपणी
सातारा : इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी साताऱ्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी सुटे भाग जोडणारे (सीकेडी) असेम्ब्ली युनिट उभारण्यासाठी जमिनीचा शोध घेत असून, मोठे भूखंड निश्चित करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे. टेस्लासह साताऱ्यात अनेक कंपन्या येण्यास इच्छुक असून, त्याही जागेची चाचपणी करीत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यास अशा उद्योगांना जागा मिळून उद्योग येऊन स्थानिक युवकांना रोजगार मिळेल.
टेस्लाच्या चीनमधील टीमकडे भारतातील इलेक्ट्रिक वाहन व्यवसायाची जबाबदारी गेल्या आठवड्यात सोपविण्यात आली आहे. हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंगसोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर साताऱ्यात युनिट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत आणि अमेरिकेत व्यापार करारावर जी चर्चा सुरू आहे, त्यात ऑटोमोबाईल्सवरील शुल्क सवलतीचाही समावेश आहे. भारत ०-१ टक्के दराने गाड्यांचे पार्ट्स आयात कर भरण्याचा प्रस्ताव देऊ शकतो. त्यामुळे अमेरिका तिच्या २५ टक्के शुल्कात सवलत देईल. या पार्श्वभूमीवर भारत एसएमईसी धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे. टेस्ला सध्या भारतातील एका दुसऱ्या नामांकित भागीदार कंपनीसोबत संयुक्त उद्योग स्थापनेच्या तयारीत आहे.
टेस्लाकडून इलेक्ट्रिक वाहनांचा सुटे भाग जोडणारा प्रकल्प (सीकेडी) उभारण्यात येणार आहे. यामध्ये गाड्यांचे सुटे भाग आणून ते भारतातील कारखान्यात जोडले जातील. त्यामुळे आयात शुल्क कमी होते व स्थानिक उत्पादनाला चालना मिळते. टेस्ला भारतात जानेवारीत येणे अपेक्षित असून, मुंबईत एक शोरूमसुद्धा निश्चित केले आहे. तेथून आयात गाड्यांची विक्री सुरू केली जाणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या विकासावर मोठा परिणाम
साताऱ्यात टेस्लाने युनिट सुरू केल्यास स्थानिक तरुणांसाठी कुशल व अकुशल नोकऱ्यांच्या संधी वाढतील. लॉजिस्टिक्स, सुरक्षा, कॅटरिंग आदींमध्ये रोजगार वाढेल. जागतिक दर्जाची कंपनी आल्यामुळे सातारा औद्योगिक नकाशावर येईल. इतर ऑटोमोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स कंपन्याही गुंतवणुकीसाठी साताऱ्याकडे आकर्षित होतील. औद्योगिक विकासामुळे रस्ते, वीज, पाणी आणि इतर औद्योगिक सुविधा उभारल्या जातील. औद्योगिक क्षेत्रात लागणाऱ्या कौशल्यांसाठी आयटीआय, पॉलिटेक्निक व इतर प्रशिक्षण केंद्रे सुरू होऊ शकतात. सीएसआर अंतर्गत स्थानिक शिक्षण व आरोग्य क्षेत्रालाही मदत मिळू शकते.