उद्योग निर्मितीसाठी शिक्षण घ्यावं, राजेंद्र जगदाळे
By प्रगती पाटील | Updated: October 4, 2023 14:07 IST2023-10-04T14:07:14+5:302023-10-04T14:07:59+5:30
रयत शिक्षण संस्थेचा १०४ वा वर्धापन उत्साहात

उद्योग निर्मितीसाठी शिक्षण घ्यावं, राजेंद्र जगदाळे
सातारा : आरक्षण आणि नोकऱ्या यासाठी सरकारकडे आंदोलन करण्यापेक्षा रोजगार निर्मितीचं शिक्षण मिळावं यासाठी आग्रह धरला पाहिजे. झपाट्याने होणाऱ्या खाजगीकरणामध्ये सरकारी किंवा कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची आशा चुकीची आहे. त्यापेक्षा उद्योग निर्मितीसाठी युवांनी स्वावलंबनाची कास धरावी अशी अपेक्षा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांनी व्यक्त केली.
रयत शिक्षण संस्थेच्या १०४ व्या वर्धापन दिन संस्थेच्या आवारात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महासंचालक राजेंद्र जगदाळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी होते. व्यासपीठावर व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील, सह सचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रभाकर देशमुख, सारंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जगदाळे यांनी महाविद्यालयात आल्यावर मुलांना घरून पैसे आणण्याची वेळ येऊ नये यासाठी अभ्यासक्रमात काही नवीन पर्यायांचाही उहापोह केला. कार्यक्रमाला रयत सेवक कर्मचारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.