Satara: कातरखटाव पुलाच्या कामाच्या ठिकाणी सुरूंग स्फोटामुळे भूकंपासारखा आवाज, लहानमोठे दगड बाजारपेठेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:10 IST2025-12-29T17:10:18+5:302025-12-29T17:10:30+5:30
व्यापारी, ग्रामस्थ भयभीत होऊन सैरावैरा

Satara: कातरखटाव पुलाच्या कामाच्या ठिकाणी सुरूंग स्फोटामुळे भूकंपासारखा आवाज, लहानमोठे दगड बाजारपेठेत
कातरखटाव : दहिवडी-विटा मार्गावर गेल्या सहा महिन्यांपासून महामार्गाचे काम जोमात सुरू आहे. कातरखटाव येथील नवीन पुलाची उभारणी करण्यासाठी रात्रंदिवस पायाभरणी तर कुठे पाया खोदण्याचे काम सुरू आहे. अशातच सुन्न असणाऱ्या व्यापारी, बाजारपेठेच्या शेजारील पुलाजवळ दुपारी ४ वाजता ब्लास्टिंगचा मोठा आवाज झाला. यावेळी लहान- मोठे दगड दुकानावर, घरावर, रस्त्यावर पडल्याने एकच गोंधळ उडाला. लोकं, ग्रामस्थ सुरक्षित ठिकाणी पळू लागले. नशीब बलवत्तर असल्याने या घटनेत जीवितहानी झाली नाही.
सविस्तर माहिती अशी की, परिसरात रविवारी आठवडी बाजार असल्याने या भागातील व्यापारी, ग्रामस्थांची गर्दी होती. दुपारी ४ वाजता काम चाललेल्या ठिकाणी अचानक ब्लास्टिंगचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. एक मिनिटाच्या आत लोकांनी, व्यापाऱ्यांनी, कामाच्या ठिकाणी धाव घेतली. ग्रामस्थांचा उद्रेक पाहता काही कर्मचाऱ्यांनी भीतीपोटी या ठिकाणाहून पळ काढल्याचे दिसून आले.
पुलाच्या मध्यभागी पाया खोदण्यासाठी सुरूंग उडवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पक्ष्यांच्या थव्याप्रमाणे दगडांचा मारा सगळीकडे झाला होता, अशी माहिती भयभीत झालेले व्यापारी, ग्रामस्थ सांगत होते व तसे दिसतही होते.
बाजाराचा दिवस आणि गर्दीच्या ठिकाणी आजूबाजूला लहान-मोठे दगड सुरूंग उडवलेल्या ठिकाणाहून सगळीकडे पसरले होते. यामध्ये नशीब बलवत्तर असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही; अशी सगळीकडे भयभीत झालेल्या महिला, पुरुषांचा एकच चर्चेचा सूर दिसून येत होता.
एकच चर्चा गणित चुकले...
याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुरुंग उडवण्याच्या अगोदर आजूबाजूच्या काही व्यापाऱ्यांना सूचना केल्या होत्या की काही काळ दुकानातून बाहेर येऊ नका, दुकाने बंद ठेवा. परंतु, सुरुंग उडवण्याचे गणित चुकल्यामुळे सुरुंगाचा स्फोट झाला, अशी चर्चा सुरू आहे.
आमच्या दुकानासमोर दीड ते दोन किलोचा मोठा दगड पडला आहे. एका ग्राहकाला थोडं खरचटलं आहे. नशीब चांगले म्हणून तो बिचारा वाचला आहे. पुलाच्या कामासाठी पाया खोदण्याकरिता सुरूंग उडवण्याचे संबंधित कंपनीचे गणित चुकत आहे. गावाच्या शेजारी एवढा मोठा सुरुंग स्फोट होणे, फार गंभीर बाब आहे. - विनायक सिंहासने, व्यापारी, कातरखटाव