माणचा दुष्काळ मेला.. त्याच्या मातीला चला! शेवटच्या दिवशीही श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:03 IST2018-05-22T23:03:43+5:302018-05-22T23:03:43+5:30
माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे.

माणचा दुष्काळ मेला.. त्याच्या मातीला चला! शेवटच्या दिवशीही श्रमदान
नवनाथ जगदाळे ।
दहिवडी : माण तालुक्याच्या इतिहासात सर्वात मोठी जलक्रांती गेल्या ४५ दिवसांत झाली. चांगला पाऊस पडल्यानंतर या गावाचा पिण्याचा पाण्याचा शंभर टक्के तसेच शेती पाण्याचा काहीअंशी प्रश्न मिटणार आहे. वीसपेक्षा जास्त गावांनी ८७ गुणांचा पेपर सोडवल्याने आपलाच नंबर, असा विश्वास आहे. दरम्यान, वावरहिरे येथे मंगळवारी दुष्काळाची अंत्ययात्रा काढली.
माणमध्ये दररोज १५ ते २० हजार लोक श्रमदान करू लागली. महाश्रमदानात एका दिवसांत ३५ हजार लोकांनी विक्रमी श्रमदान केली. तहसीलदार सुरेखा माने, समन्वयक अजित पवार, डॉ. प्रदीप पोळ, प्रफुल्ल सुतार यांनी तालुका पिंजून काढला. सहा महिने अगोदरच चारशेहून अधिक ग्रामसभा झाल्या. माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सचिव नामदेव भोसले, वाहतूक निरीक्षक गजानन ठोंबरे, अधिकारी प्रवीण इंगवले यांच्या मदतीने चाळीसहून अधिक बैठका झाल्या.
दानवलेवाडी, नरवणे, धामणी येथे ७ एप्रिलच्या मध्यरात्री बाराला पहिला टिकाव टाकला. मशाल फेरी काढली. अनेक ठिकाणी दिव्यांग, वयोवृद्ध ग्रामस्थांनीही श्रमदान केले. खुटबाव, भाटकी, रांजणी या ठिकाणी लोक अंत्यविधी करून कामाला आले. दिवड, डंगिरेवाडी, खुटबाव, कुकडवाड, भांडवली, मलवडी येते वधूवरांनी लग्नापूर्वी श्रमदान केले. गोंदवले खुर्द येथील रोहित व रक्षिता या बहीण-भावाने काम करून इतरांना प्रेरणा दिली. गाडेवाडीत शालेय मुलींनी आखणी व मोजणीची जबाबदारी घेतली.
खासदार शरद पवार, मंत्री महादेव जानकर, मंत्री सदाभाऊ खोत, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार वंदना चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह अमीर खान, सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, हेमांगी कवी, गिरीश कुलकर्णी यांनी उत्साह वाढवला. माजी आमदार प्रभाकर घार्गे, आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे, अनिल देसाई, सुरेखा पखाले, युवराज सूर्यवंशी, सिद्धनाथ पतसंस्था, अहिंसा पतसंस्था, चैतन्य पतसंस्था, प्रियदर्शनी पतसंस्था, ड्रीम फाउंडेशन, नामदेव भोसले, आयुक्त वंदना धायगुडे यांनी मदत केली. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष भरतेश गांधी यांनी तालुक्यात मशीन उपलब्ध करून दिल्या.
‘लोकमत’मुळे चळवळीला बळ
मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे जलसंधारणाची मोठी चळवळ उभी राहिली. माण तालुक्यात सुरू असलेल्या वॉटर कप चळवळीला ‘लोकमत’मुळं बळ आलं,’ असे कौतुक मंत्री महादेव जानकर यांनी केले.