सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती; आत्ताच ८६ गावे, ३०० वाड्यांना कोरड

By नितीन काळेल | Published: February 12, 2024 06:36 PM2024-02-12T18:36:34+5:302024-02-12T18:37:37+5:30

दीड लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा; भीषणता वाढणार 

Drought condition in Satara District; Water supply by tanker to 86 villages, 300 wadi | सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती; आत्ताच ८६ गावे, ३०० वाड्यांना कोरड

सातारा जिल्ह्यात दुष्काळी स्थिती; आत्ताच ८६ गावे, ३०० वाड्यांना कोरड

सातारा : जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने टंचाईत वाढ होऊ लागली आहे. सध्या ८६ गावे आणि २९८ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यावर सुमारे दीड लाख नागरिकांची तहान अवलंबून आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अशी स्थिती असताना मे महिन्यात टंचाईचे काय हाेणार असा प्रश्न भेडसावू लागला आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यात टँकर सुरू झाले. आजही अनेक गावांचे टँकर बंद झालेले नाहीत. जवळपास ११ महिन्यांपासून संबंधित गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतोय. याला कारण म्हणजे गेल्यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी झाला. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्भवली आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. यामुळे लोकांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तरीही चार-पाच दिवस टँकर फिरकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे लोकांची पाण्यासाठी रानोमाळ भटकंती सुरू आहे. तसेच पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

मागील महिन्यांपासून टंचाईची स्थिती वाढली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच तालुक्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये माण तालुक्यात परिस्थिती गंभीर बनत चाललीय. माणमधील ३७ गावे आणि २४६ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी ४६ टँकर सुरू आहेत. या टँकरवर ६१ हजार नागरिक आणि सुमारे ७१ हजार पशुधनाची तहान अवलंबून आहे. तालुक्यातील वडगाव, पाचवड, मोगराळे, बिजवडी, जाधववाडी, अनभुलेवाडी, मोही, थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, सोकासन, राणंद, हस्तनपूर, भाटकी, खडकी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, रांजणी, पळशी, गोंदवले बुद्रुक, जाशी, भालवडी, खुटबाबव, मार्डी, पर्यंती, इंजबाव, वारुगड, परकंदी, टाकेवाडी आदी गावांना आणि त्याखालील वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातही टंचाई वाढत आहे. सध्या १३ गावे आणि ९ वाड्यांतील २२ हजार नागरिक आणि चार हजारांवर जनावरांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. तालुक्यात सध्या १२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मांजरवाडी, नवलेवाडी, मांडवे, नागाचे कुमठे, गोसाव्याचीवाडी, धारपुडी आदी गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातही १३ गावे आणि ४३ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. सासवड, वडले, आरडगाव, मिरगाव, घाडगेमळा, कापडगाव, कोरेगाव, नाईकबोमवाडी, मिरढे, आदर्की बुद्रुक, आंदरुड आदी गावांसाठी ११ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टँकरवर फलटणमधील २३ हजार नागरिक आणि १७ हजारांवर पशुधनाची तहान अवलंबून आहे.

कोरेगाव तालुक्यात २२ गावांतील ३३ हजार नागरिक आणि अडीच हजार पशुधनासाठी १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चवणेश्वर, होलेवाडी, विखळे, जाधववाडी, होसेवाडी, सिद्धार्थनगर, गुजरवाडी, अनभुलेवाडी, नायगाव, नांदवळ, वाठार स्टेशन, बिचुकले, चिलेवाडी, नागेवाडी, सोळशी, पिंपोडे बुद्रुक, तळिये, भाडळे, नलवडेवाडी, आझादपूर आदी गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. वाई तालुक्यातही एका गावासाठी टँकर सुरू आहे.

जिल्ह्यात आताच टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे आगामी काळात उन्हाळा सुरू होत आहे. परिणामी पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावे लागणार आहे. २०१८ प्रमाणेच टंचाईची स्थिती निर्माण होण्याचीही भीती व्यक्त होत आहे.

९५ हजार पशुधन बाधित; ८९ टँकर सुरू..

जिल्ह्यात माणसांना पाणी मिळेनासे झाले आहे. तसेच पशुधनही दुष्काळात भरडलेय. त्यामुळे आज ९५ हजार जनावरांना टँकरच्या पाण्याचा आधार आहे. यामध्ये गाय, म्हशीप्रमाणेच शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. तर सध्या नागरिक आणि पशुधनासाठी ८९ टँकर सुरू आहेत. तसेच या टँकरबरोबरच विहिरी आणि बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या माण तालुक्यात ९ विहिरी आणि १५ बोअरवेलचे अधिग्रहण झाले आहे. तर खटाव तालुक्यात २ विहिरी, १७ बोअरवेलचे तसेच वाई तालुक्यात १२ विहिरींचे अधिग्रहण झालेले आहे.

Web Title: Drought condition in Satara District; Water supply by tanker to 86 villages, 300 wadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.