साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, आदिवासींसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांना पद्मश्री पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 12:05 IST2026-01-27T12:03:49+5:302026-01-27T12:05:34+5:30
लग्नानंतर फक्त दोन आठवड्यांनी, ते बस्तरच्या दुर्गम भागात आले आणि आदिवासी समुदायाशी एकरूप झाले

साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, आदिवासींसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉ. राम गोडबोले यांना पद्मश्री पुरस्कार
सातारा : छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशात आदिवासी समुदायाची सेवा करण्यासाठी आयुष्य समर्पित करणारे साताऱ्यातील डाॅ. राम गोडबोले व त्यांच्या पत्नी सुनीता यांना शासनाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री जाहीर केला. यामुळे साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
साताऱ्यात जन्मलेल्या डॉ. राम गोडबोले यांनी ३० वर्षांपूर्वी आर्यांग्ल हाॅस्पिटलमध्ये आयुर्वेदिक औषध आणि शस्त्रक्रियेचे शिक्षण घेतले. त्यांच्या मनात समाजसेवेचे बीज तरुण वयातच अंकुरले. सुमारे १८-१९ वर्षांच्या वयात त्यांनी अल्बर्ट श्वेत्झर यांच्या जीवनावरील एक पुस्तक वाचले, ज्याने त्यांच्या विचारसरणीत बदल घडवून आणला. श्वेत्झर - एक महान समाजसेवक आणि डॉक्टर होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आफ्रिकेतील वंचित समुदायांना समर्पित केले आणि १९५२ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. त्याचक्षणी डॉ. गोडबोले यांनी ठरवले की औषध हे त्यांचे उपजीविका नसून त्यांची आध्यात्मिक साधना असेल.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वनवासी कल्याण आश्रम या अखिल भारतीय संघटनेत सामील झाले आणि महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील कनाशी येथे राहणाऱ्या भिल्ल आदिवासी समुदायाला आरोग्यसेवा पुरविण्यास त्यांनी सुरुवात केली. काही वर्षांनंतर वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील बारसूर गावात पाठवण्यात आले, जिथे एक आरोग्य केंद्र बराच काळ बंद होते. हे ठिकाण त्यांचे कायमचे कामाचे ठिकाण बनले.
आश्रमाने त्यांना एकटे न जाण्याचा आणि प्रथम लग्न करण्याचा सल्ला दिला. या काळात, त्यांची भेट पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीता पुराणिक यांच्याशी झाली. ज्या महिला सक्षमीकरण आणि साक्षरता अभियानात सक्रिय होत्या. सुनीताताई रायगड जिल्ह्यातील वनवासी कल्याण आश्रमाच्या जांभिवली केंद्रात सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही काम करत होत्या. दोघांचीही विचारसरणी आणि सेवेची भावना समान होती.
लग्नानंतर फक्त दोन आठवड्यांनी, ते बस्तरच्या दुर्गम भागात आले आणि आदिवासी समुदायाशी एकरूप झाले. सध्या डॉ. गोडबोले आणि त्यांच्या पत्नी बारसूर गावात एका साध्या दोन खोल्यांच्या घरात राहतात. विटांच्या भिंती, पत्र्याचे छप्पर आणि त्याभोवती घनदाट जंगल आहे. येथे लोकांकडे औषधांसाठी पैसेच नाहीत आणि वाहतूक जवळजवळ अस्तित्वात नाही.
समाजमाध्यमावर कौतुक
डॉ. राम गोडबोेले हे साताऱ्यातील आर्यांग्लचे माजी विद्यार्थी असल्याने पद्मश्री जाहीर झाल्याचे कळताच असंख्य माजी विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर कौतुकाचे संदेश पोस्ट केले.