महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:11 IST2025-10-26T16:10:00+5:302025-10-26T16:11:01+5:30
बराच वेळ आरोपीला ग्रामीण ठाण्यात बसवून ठेवले.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
फलटण : महिला डॉक्टर आत्महत्या व अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा शनिवार(दि. २५) रोजी रात्री अकरा वाजता अचानकपणे रिक्षाने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. वास्तविक फलटण शहर पोलिस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा नोंद आहे. असे असताना तो ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये आरोपी बदने हजर झाला त्यावेळी त्याला ग्रामीण पोलिसांनी ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवले होते. वास्तविक, क्षणाचाही विलंब न दवडता आरोपी बदनेला शहर पोलिसांच्याकडे सुपुर्द करायला हवे होते. ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये त्याला थांबवून नक्की काय केले, असा प्रश्नही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्यामधून बदने याला शहर पोलिस ठाण्यामध्ये बंदोबस्तात नेण्यात आले. त्याची प्राथमिक चौकशी एका बंद खोलीत करण्यात आली. यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याला नेण्यात आले.
सरेंडर पूर्वनियोजित?
बदने याचे सरेंडर पूर्वनियोजित असावे? कारण एरव्ही रात्री अकरा नंतर मोजकेच पोलिस स्थानकात हजर असतात. परंतु बदने हजर झाला. त्यावेळी स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे हजर होते. महत्त्वाचे सगळे पोलिस अधिकारीही दोन्ही पोलिस ठाण्यांमध्ये ड्यूटीवर होते. त्यामुळे तो सरेंडर करणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना असावी, असेही बोलले जात होते.