ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगावहून फलटणकडे मार्गस्थ, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 17:41 IST2022-07-01T17:41:08+5:302022-07-01T17:41:46+5:30
पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पान, फूल, बुक्याच्या उधळणीत माउली भक्तांनी दर्शन घेतले.

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगावहून फलटणकडे मार्गस्थ, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
मलटण : पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी ।।
जागृती स्वप्नी पांडुरंग ।।
असे म्हणत मोठ्या भक्तिमय वातावरणात ज्ञानेश्वर महाराज पालखी आज, शुक्रवारी सकाळी तरडगावहुन फलटणकडे मार्गस्थ झाली. विठूनामाचा जयघोष करत वैष्णव भक्तांच्या भक्तीला उधान आले होते. काळजमध्ये दर्शनासाठी पालखी काही काळ थांबल्यानंतर सुरवडीच्या दिशेने निघालेल्या पालखीचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पान, फूल, बुक्याच्या उधळणीत माउली भक्तांनी दर्शन घेतले.
सुरवडी येथे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी पालखीचे स्वागत केले. या ठिकाणी माऊलींच्या पादुकांची विधिवत पूजा व आरती सुरवडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. नांदल साखरवाडी खराडेवाडी पिंपळवाडी घडगेमळा या पंचक्रोशितील लोकांनी सुरवडी येथे दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
दुपारच्या न्याहरीसाठी पालखी निंभोरे येथे थांबली. याठिकाणी प्रशासनच्या उत्तम नियोजनामुळे जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला. निंभोरे येथे मिरगाव वठार निंबाळकर पंचक्रोशितील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. अडीच ते तीन तासांच्या विश्रांती नंतर पालखी वडजलकडे मार्गस्थ झाली.
वडजलचे गावकरी पालखी घ्यायला निमभोर पर्यंत आले होते. वडजलहून पालखी मलटणकडे मार्गस्थ झाली. अवघे मलटण पालखीला घ्यायला वडजलमध्ये दाखल झाले होते. पालखी मार्गात रांगोळी रेखाटली होती तर काही भविकांनी फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. पालखी रथाचे आगमन होताच मलटण येथील तरुण मंडळांनी पुष्पवृष्टी केली.