Satara ZP: निमित्त अभिवादनाचे, पण म्हणे चर्चा सत्तास्थापनेची !
By प्रमोद सुकरे | Updated: March 11, 2026 19:23 IST2026-03-11T19:22:23+5:302026-03-11T19:23:52+5:30
मुंबईत ‘मेघदूत’वर लोकनेत्यांना अभिवादन : शंभूराज देसाई अन् अतुल भोसले यांच्या फोटोची चर्चा

Satara ZP: निमित्त अभिवादनाचे, पण म्हणे चर्चा सत्तास्थापनेची !
प्रमोद सुकरे
कराड : सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेवरून जिल्ह्यातील महायुतीत ताणाताणी सुरू आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही भाजपचाच अध्यक्ष होईल, असा दावा भाजप मंत्र्यांनी केला आहे; तर भाजपला बाजूला ठेवत सत्ता स्थापनेची व्यूहरचना राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेनेने केल्याचे जाणवत आहे.
त्यामुळे वातावरण तापले असताना मंगळवारी दिवंगत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत मंत्री शंभूराजे यांच्या मेघदूत बंगल्यावर महायुतीतील नेत्यांची मांदियाळी जमली होती. यादरम्यान मंत्री शंभूराज देसाई व भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्यात बराच काळ चर्चा झाली. त्याचे फोटो समाजमाध्यमांतून व्हायरल झाल्याने जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत येणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत एकहाती सत्ता मिळवण्याची सिंहगर्जना केली होती. मात्र त्यांना मॅजिक फिगर गाठता आलेली नाही; तर शिंदेसेना-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली व त्यांनी सत्तास्थापनेचा आकडाही गाठला आहे. मात्र प्रचारादरम्यान झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी शिंदेसेना व राष्ट्रवादी नेत्यांच्या जिव्हारी लागल्या आहेत. त्यामुळेच आता जिल्ह्यात महायुतीचा मेळ घालणे अवघड झाले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा मुहूर्त आता २० मार्च ठरला आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच मंगळवारी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री मकरंद पाटील, गिरीश महाजन, आदींनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
या दरम्यान कराड दक्षिणचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनीही तेथे अभिवादन केले. अभिवादन केल्यानंतर मंत्री देसाई व अतुल भोसले यांनी एका सोफ्यावर बसत बराच वेळ चर्चा केली. परंतु कार्यकर्त्यांनी मात्र या चर्चेला राजकीय संदर्भ जोडले आहेत बरं. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सत्तास्थापनेची चर्चा झाली की काय? याबाबत कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.