Rain: कऱ्हाडला आपत्ती निवारण पथक दाखल, व्यवस्थापन कक्षही चोवीस तास सतर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 19:23 IST2022-07-06T19:22:31+5:302022-07-06T19:23:23+5:30
गतवर्षी ओढवलेली परिस्थिती पाहता यंदा प्रशासन पावसाळ्याच्या सुरूवातीलाच सज्ज झाले आहे.

Rain: कऱ्हाडला आपत्ती निवारण पथक दाखल, व्यवस्थापन कक्षही चोवीस तास सतर्क
कऱ्हाड : कऱ्हाडसह पाटण तालुक्यात पावसाने जोर धरल्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्ती निवारण दल कऱ्हाडात दाखल झाले आहे. एका अधिकाऱ्यांसह अठरा जवानांचा सहभाग असलेल्या या पथकाने कऱ्हाडात तळ ठोकला असून प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्षही सज्ज केला आहे.
गतवर्षीच्या भुस्खलन आणि पुराच्या आठवणी आजही ताज्या आहेत. पाटण तालुक्यात गतवर्षी २३ जुलैच्या रात्री मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाले होते. त्यामुळे पाच ते सहा गावे दरडींखाली गाडली गेली. काहीजणांचा मृत्यू झाला तर अनेकजण त्या दरडींखाली दबले गेल्यामुळे जखमी झाले. संबंधितांना वेळेत मदतही मिळाली नाही. तसेच पाटण व कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये महापूर आला होता. गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. तेथील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासह आवश्यक त्या उपाययोजना करताना प्रशासनाची दमछाक झाली होती. गतवर्षी ओढवलेली ही परिस्थिती पाहता यंदा प्रशासन पावसाळ्याच्या सुरूवातीलाच सज्ज झाले आहे.
कऱ्हाडातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सतर्क ठेवण्यात आला असून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यातच संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) बुधवारी कऱ्हाडात हाडात दाखल झाले आहे. या दलात एका अधिकाऱ्यांसह सतरा जवानांचा सहभाग आहे. आवश्यकता वाटेल त्याठिकाणी तातडीने हे पथक पाठविले जाणार असून सध्या कऱ्हाडातच या पथकाने तळ ठोकला आहे. तसेच आवश्यक बोटी, जॅकेटही जवानांना पुरविण्यात आल्या आहेत.