Satara ZP Election 2026: भाजपने घेरलं तरी शिंदेसेनेच्या शंभूराज देसाईंनीच मैदान मारलं
By प्रमोद सुकरे | Updated: February 11, 2026 17:25 IST2026-02-11T17:23:51+5:302026-02-11T17:25:56+5:30
मंत्री जयकुमार गोरे, गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसलेंच्या तोफा ठरल्या फोल

Satara ZP Election 2026: भाजपने घेरलं तरी शिंदेसेनेच्या शंभूराज देसाईंनीच मैदान मारलं
प्रमोद सुकरे
कराड : पालकमंत्री, शिंदेसेनेचे नेते शंभूराज देसाई यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने दस्तुरखुद्द मित्रपक्ष भाजपने होमपिचवरच घेरलं होतं. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे व गणेश नाईक यांनी प्रत्येकी दोन तर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी येथे एक प्रचार सभा घेतली होती. पण मंत्री देसाईंनी एकट्यानेच खिंड लढविली. प्रत्यक्ष निकालानंतर भाजपने घेरलं तरी शिंदेसेनेच्या शंभूराज देसाईंनीच मैदान मारल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. कारण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा तर पंचायत समिती १३ जागा शंभूराज देसाई यांनी जिंकलेल्या आहेत. तर विरोधी भाजपला फक्त प्रत्येकी एक जागा जिंकता आली आहे.
खरंतर राज्यात आणि देशात भाजपबरोबर शिंदेसेना सहभागी आहे. त्यामुळे हातात हात घालून हे एका बाजूला काम करत असताना प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच सातारा जिल्ह्यात ‘दोस्तीत कुस्ती’ सुरू झाली. त्याचाच ट्रेलर पाटण विधानसभा मतदारसंघात पहायला मिळाला. पण मंत्री देसाई भाजपला पुरून उरले आहेत.
वास्तविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ज्या आमदारांनी फडणवीस यांना मदत करण्याचा निर्णय घेतला त्यात शंभूराजांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.
हे सगळे खरे असले तरी राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो याचा प्रत्यय पाटण विधानसभा मतदारसंघात आला. कारण शंभूराज देसाई यांचे विरोधक असणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकरांना विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने गळाला लावत पाटण विधानसभा मतदारसंघात ताकद वाढवायला मुहूर्त केला. त्यानंतर झालेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्याच निवडणुकीत मोठी रसदही पुरवली. मात्र, त्याचा उपयोग झाल्याचे दिसले नाही.
पंखात बळ भरण्याचा प्रयत्न फोल
नुकत्याच झालेल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारांच्या हातात पालकमंत्री शंभूराज देसाईंनी ‘धनुष्यबाण’ दिला. तेथे जाऊन भाषणे ठोकली. नेमकी हीच सल मंत्री जयकुमार गोरे यांच्या मनात राहिली. त्यामुळे त्यांनी देखील पाटणला येत पालकमंत्री कोणीही असू देत आपल्याला काही फरक पडत नाही. असा टोला लगावत पाटणकरांच्या पंखात बळ भरण्याचा प्रयत्न केला होता. पण तो फोल ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नाईकांकडून तर एकेरी भाषा
भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी देखील पाटण तालुक्यात दोन प्रचार सभा घेत पालकमंत्री देसाई यांचा एकेरी भाषेत समाचार घेतला होता. त्यात इथला पालकमंत्री मुंबईला आमचा टांगा पलटी करायला आला होता. त्याच्यात हिम्मत असेल तर टांगा पलटी करून दाखव असे जाहीर आव्हान दिले. त्यावरून ते पाटणला मंत्री देसाईंचा टांगा पलटी करायला प्रचार सभेच्या निमित्ताने आले होते हे लक्षात आल्यावाचून राहिले नाही. पण त्यांच्या भाषणाने शंभूराज देसाईंचा टांगा पलटी तर झाला नाहीच, उलट मतदारांनी शंभूराजांनाच साथ दिल्याचे दिसून आले.
शंभूराजांचा विश्वास मतदारांनी सार्थ ठरविला
माझ्यावर कोणीही काहीही टीका करत असले तरी मी त्यावर काही बोलणार नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालातूनच मतदार टीकाकारांना उत्तर देतील. असा विश्वास मंत्री शंभूराज देसाईंनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. आता तो विश्वास मतदारांनी सार्थ ठरविल्याचे दिसत आहे.
बनपुरीच्या लेकीनं केली कमाल
पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तगड्या उमेदवार असणाऱ्या डॉ. प्राची नरेंद्र पाटील यांच्या विरोधात शिंदेसेनेच्या मृणाल महेश पाटील या २२ वर्षांच्या तरुणीने ही निवडणूक लढली. या निवडणुकीत मंत्री शंभूराज देसाई यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे ही निवडणूक जिंकलीसुद्धा आता त्याचीच चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सध्या सुरू आहे.