एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:30 IST2025-01-20T12:28:39+5:302025-01-20T12:30:01+5:30
पालकमंत्री पदांच्या वाटपाबाबत नाखुशी?

एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर, राजकीय तर्कवितर्कांना उधाण
सातारा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे दौऱ्यावर आले आहेत. राज्यातील पालकमंत्री पदांच्या नियुक्या झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे गावी आल्यामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी सकाळी साडेअकरा वाजता अचानक साताऱ्यातील आपले मूळ गाव असलेल्या दरे दौऱ्यावर आले आहेत. राज्यभरात अनेक राजकीय घडामोडी घडत असताना उपमुख्यमंत्री अचानक त्यांच्या मूळ गावी आले आहेत. हा पूर्ण खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते कोणालाही भेटणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दरे दौऱ्याबाबत प्रशासनाला कोणतीही कल्पना नाही. शिंदेंच्या दरे गावच्या बंगल्याबाहेर पूर्णपणे शुकशुकाट आहे. राज्यात सध्या राजकीय रणकंदन सुरू असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दरे गावी जाणे पसंत केले आहे. काहीच दिवसांपूर्वी शिंदे यांचा दौरा झाल्यामुळे लगेच हा दुसरा दौरा असल्यामुळे चर्चा तर सुरू झाली आहे.
पालकमंत्री पदांच्या वाटपाबाबत नाखुशी?
राज्यात नुकत्याच पालकमंत्री पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शंभूराज देसाई यांची सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचे पाटण मतदारसंघात स्वागत होत आहे. तथापि, वाई आणि सातारा मतदारसंघांतील दोन्ही मंत्र्यांच्या दिलेल्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर फारसा उत्साह दिसून आलेला नाही. शिंदेसेनेच्या भरत गोगावले यांना डावलून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद मिळाले आहे. यावरून पक्षात नाराजी दिसत आहे. ज्यांना हवा असणारा जिल्हा मिळाला नाही, त्यावरूनही अंतर्गत कुरबुरी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.