साताऱ्यात दोन्ही पवार एकत्र; पण मनोमिलनासाठी ‘वेट ॲड वॉच’
By हणमंत पाटील | Updated: May 10, 2025 17:13 IST2025-05-10T17:09:37+5:302025-05-10T17:13:55+5:30
हणमंत पाटील सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या विधानाने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली; ...

साताऱ्यात दोन्ही पवार एकत्र; पण मनोमिलनासाठी ‘वेट ॲड वॉच’
हणमंत पाटील
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या विधानाने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली; पण साताऱ्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार व शरद पवार एकत्र आले; पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद न करता बगल दिली. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही पवार यांच्या मनोमिलनासाठी कार्यकर्त्यांना ‘वेट ॲड वॉच’ करावा लागणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना व मनसे एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही अटीवर त्यासाठी संमती दर्शविली. ठाकरे बंधू एकत्रीकरणाच्या चर्चाला शरद पवार यांच्या पुण्यातील विधानाने कलाटणी मिळाली. ‘राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आम्हाला आनंदच वाटेल,’ असे सूचक विधान करीत शरद पवार यांनी या एकत्रीकरणाचा चेंडू अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात टाकला. त्यामुळे सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही पवार गुरुवारी एकत्र आल्याने कार्यकर्त्यांना उत्सुकता होती.
दरम्यान, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ९ मे रोजी पुण्यतिथीच्या निमित्ताने साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमाला एक दिवस अगोदर शरद पवार हे साताऱ्यात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी त्यांचे विश्रामगृह येथे गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेते व कार्यकर्ते एकाच विचाराचे असल्याने ते साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्ताने शुक्रवारी एकत्र आले. खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, चेतन तुपे, आमदार शशिकांत शिंदे असे दोन्ही गटांतील नेते व पदाधिकारी एकत्र आले.
यावेळी अजित पवार गटाचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व खासदार सुळे यांनी एकमेकांशी चर्चा केली. तसेच दोन्ही गटांतील दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोमिलन दिसून आले. मात्र, शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे हे एका व्यासपीठावर असूनही त्यांनी एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्सुकतेवर पाणी पडले. आता राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पवार कुटुंबाचे मनोमिलन गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.