महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळातील नादुरुस्त वाहने हटवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 18:02 IST2021-01-02T17:59:42+5:302021-01-02T18:02:59+5:30
Mahabaleshwar Hill Station Satara area -महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर अनेक महिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक वाहनांची क्रेनच्या साहाय्याने पालिकेने उचलबांगडी केली आहे. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली.

महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळातील नादुरुस्त वाहने हटवली
महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या बहुमजली वाहनतळावर अनेक महिने जागा अडवून उभ्या असलेल्या भंगार व नादुरुस्त वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशा अनेक वाहनांची क्रेनच्या साहाय्याने पालिकेने उचलबांगडी केली आहे. काही वाहनांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. ही कारवाई मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केली.
महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी दरवर्षी साधारण वीस ते पंचवीस लाख पर्यटक भेटी देतात. दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असल्याने अनेकवेळा वहातुकीची कोंडीची मोठी समस्या निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी वाहनतळाची असलेली आवश्यकता लक्षात घेत पालिकेने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारले आहे.
हे वाहनतळही मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना अपुरे पडत असते. तरीही या वाहनतळाचा काही नागरिकांनी गैरफायदा उठवण्याच्या उद्देशाने आपली भंगार व नादुरुस्त टाकाऊ वाहने या वाहनतळावर आणून उभी केली आहेत. ही वाहने अनेक महिने एकाच जागी उभी आहेत. या वाहनांमुळे पर्यटकांची प्रचंड गैरसोय होत असून पर्यटकांना आपली वाहने अन्यत्र उभी करावी लागत आहेत.
वाहनतळाबरोबरच शहरातील काही रस्त्यांवर अशाच प्रक्रारे वाहने उभी असून मोठा अडथळा होत आहे. याबाबत काही नागरिकांनी मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दाखल घेऊन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी संबंधित वाहनांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला पालिका कर्मचाऱ्यांना सूचना देऊन एक कृती आराखडा तयार केला.
या आराखड्यानुसार मुख्याधिकारी पल्लवी पाटील पालिका कर्मचारी व क्रेनसह पालिकेच्या वाहनतळात पोचल्या. त्यांनी तात्काळ नादुरुस्त व भंगार वाहनावर क्रेनच्या साहाय्याने कारवाई सुरु केली. काहींवर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे शरद मस्के आदी उपस्थित होते.