पेट्री : शहराच्या पश्चिमेकडील कास परिसराने सिनेमासृष्टीलाही भुरळ घातली आहे. सातारा-कास मार्गावरील निसर्गसौंदर्याला गेल्या कित्येक वर्षांपासून विघ्नसंतुष्टांची नजर लागत आहे. वणव्यात होरपळून बुंधक्यांची परिस्थिती पाहता, झाडे जिवंतपणी मरणयातना सोसून कोणत्याहीक्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे ‘मी संपलोय... आता माझ्या बांधवांना तरी जगूद्यात’, अशी आर्त हाक या जमीनदोस्त होणाऱ्या झाडांकडून होताना दिसत आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास, बामणोलीची ओळख आहे. देश-विदेशातून बहुसंख्य पर्यटक या पर्यटनस्थळी वर्षभर भेट देत असतात. इथला गर्द, दाट हिरवागार निसर्ग नेहमीच पर्यटकांना मोहिनी घालतो. धकाधकीच्या जीवनात मनाला प्रसन्नता, शुद्ध हवा, निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बहुसंख्य पर्यटक या परिसरात पर्यटनास येतात.
येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मायेच्या सावलीचा सुखावह स्पर्श देण्यात मोलाचा वाटा येथील घनदाट झाडी-झुडपे, वृक्षांचाच आहे. येथील बहुसंख्य वनसंपदेनेच निसर्गाचे सौंदर्य वाढविलेले आहे. परंतु वणवा लावणाऱ्यांकडून येथील वनसंपदा दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने निसर्गसौंदर्य लोप पावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून समाजात एक चळवळ उभी राहून प्रत्येक मनुष्याने विवेकबुद्धीने जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. मरणयातना सोसणाऱ्या या झाडाची आर्त हाक तसेच त्यांच्या भावना ओळखून वणव्याच्या विरोधात समाजात जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो. ऊन, वारा, पावसापासून ही झाडे कित्येक वर्षे तग धरून पर्यावरणाचे संतुलन राखत असताना देखील, वणव्याने झाडांचा बुंधा आगीत धुपून आजही हे झाड आपली व्यथा कळकळीने इतरांपर्यंत पोहोचवताना केवळ नावापुरतीच तग धरून उभे आहे, ते केवळ आपल्या बांधवांच्या सुरक्षिततेसाठी तसेच यावर घरटे करून राहणाऱ्या पाखरांसाठी!
चौकट
वणवा उठला मुळावर..
असा आम्ही काय अपराध केला, म्हणून आमच्या मुळावर उठता आहात, अशी अंत:करणापासून आपणा सर्वांना हे झाड विनवणी तर करत नसेल ना? यामुळे वणवा लागणार नाही याचा सर्वांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. तसेच लागलेला वणवा तत्काळ विझविण्यासाठी आपली माणुसकी जिवंत ठेवली गेली पाहिजे.
(कोट)
वणव्यांमुळे प्राणीसंपदा, वनसंपदा धोक्यात येऊन पर्यावरणाचा समतोल बिघडला जातो. तसेच वणव्यांमुळे कित्येक पशु-पक्ष्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊन पशु-पक्ष्यांच्या अधिवासात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा विकृत घटनांवर वेळीच पायबंद घातला जाणे गरजेचे आहे. तसेच वणवा पेटविण्याची ही विघातक प्रवृत्ती थांबली गेली पाहिजे.
- निकेश पवार, पर्यावरणप्रेमी, सातारा
०८पेट्री
सातारा-कास मार्गावरील निसर्गसौंदर्याला गेल्या कित्येक वर्षांपासून विघ्नसंतुष्टांची नजर लागत आहे. लागलेल्या या वणव्यात अनेक वृक्षांसह जीवजंतूही जळून खाक झाले.