Satara: उपाशीपोटी दिवसभर दारू पिला; युवक रस्त्यावरच जीवाला मुकला!
By संजय पाटील | Updated: March 14, 2024 18:14 IST2024-03-14T18:11:02+5:302024-03-14T18:14:42+5:30
कऱ्हाड : दिवसभर उपाशीपोटी राहून दारु पिल्यानंतर भरऊन्हात रस्त्याकडेला पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला. कऱ्हाडातील बसस्थानकानजीक ही घटना घडली. अभिजीत ...

Satara: उपाशीपोटी दिवसभर दारू पिला; युवक रस्त्यावरच जीवाला मुकला!
कऱ्हाड : दिवसभर उपाशीपोटी राहून दारु पिल्यानंतर भरऊन्हात रस्त्याकडेला पडलेल्या युवकाचा मृत्यू झाला. कऱ्हाडातील बसस्थानकानजीक ही घटना घडली. अभिजीत रामचंद्र सरोटे (रा. येवती, ता. कऱ्हाड) असे मृत युवकाचे नाव आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बसस्थानकानजीक बिरोबा मंदिर ट्रस्टसमोर काल, बुधवारी रात्रीच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह नागरीकांना आढळला. नागरीकांनी याबाबतची माहिती कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी मृताबद्दल चौकशी केली. मात्र, त्याची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा त्याची ओळख पटली. येवती येथील अभिजीत सरोटे या युवकाचा तो मृतदेह असल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर कुटूंबियही तातडीने कऱ्हाडात दाखल झाले. त्यांनीही मृताला ओळखले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा नातेवाईकांनी युवकाचा मृतदेह ताब्यात घेतला.
दरम्यान, पोलिसांनी कुटुंबीय आणि नातेवाईकांकडे केलेल्या चौकशीत मृत अभिजीत यास दारूचे व्यसन होते, अशी माहिती समोर आली. बुधवारी दिवसभर तो मद्यधुंद अवस्थेत होता. काहीही खाल्ले नव्हते. अति मद्यप्राशन आणि उपाशीपोटी अवस्थेत तो दिवसभर उन्हात रस्त्याकडेला पडून होता. त्यातच त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे कारण गुरूवारी दुपारी शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.