लोकमत न्यूज नेटवर्क
पुसेगाव : जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाने धुमाकूळ घातला असला, तरी पूर्वेला असल्याने खटाव तालुक्यात मात्र अद्यापही मुसळधार पावसाची आवश्यकता जाणवू लागली आहे. तालुक्यातील नऊ तलावांपैकी सहा तलाव पाण्याविना कोरडेच आहेत तर इतर तीन तलावांत थोडाफार पाणी साठा झाला आहे.
तालुक्याच्या उत्तर भागासह अनेक गावांना वरदान असणाऱ्या नेर तलावातील केवळ ३५ टक्के म्हणजे १४५.१४ दशलक्ष घनफूट, दरुज तलावात १६.९५ दलघफू, तर मायणी तलावात ५१.५५ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आजमितीला झाला आहे. तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या तलावांत केवळ पाण्याचा मृतसाठा आहे. खटाव तालुक्यात एकूण नऊ तलाव आहेत. ब्रिटिशकालीन वास्तू शिल्पाचा उत्कृष्ट नमुना असणारा नेर हा मध्यम स्वरुपाचा तलाव आहे. या तलावाची पाणी साठवण क्षमता ४१६.२० दशलक्ष घनफूट इतकी आहे तर इतर ८ लघुप्रकल्प आहेत.
खटाव तालुका अवर्षणप्रवण क्षेत्र असून, या भागात पर्जन्यमान अत्यंत कमी व बेभरवशाचे असते. येथील शेती निसर्गाच्या लहरीपणाची सातत्याने शिकार होत असते. बऱ्याच वर्षांपासून खटाव तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम राहिले आहे. जिहे-कठापूर योजना लवकर कार्यान्वित झाल्यास संपूर्ण तालुक्याला त्याचा फायदा होणार आहे. मात्र, शासनाच्या लालफितीच्या कारभाराची वाट पाहत येथील जनतेला बसावे लागत आहे. दिवसेंदिवस नेर तलावातील पाणी साठ्यात कमालीची घट होत आहे. या तालुक्याचा तारणहार असलेला इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाच्या काळातील नेर तलावात पाऊस काळ चांगला तरच पाणीसाठा होऊन तलाव पूर्ण क्षमतेने भरू शकतो, ही आजची वस्तुस्थिती आहे. येरळा नदी वाहू लागल्यास तालुक्यातील इतर गावांनाही त्याचा फायदा होत असतो. नैसर्गिकरित्या सर्वच तलाव भरण्यासाठी या भागात मोठ्या पावसाची गरज आहे.
(चौकट..)
पाणीसाठवण क्षमता व घनफूट पुढीलप्रमाणे..
दरूज (१०९.८८३) येळीव (७९.९७) शिरसवडी (६८.१३) मायणी (५९.४५) कानकात्रेवाडी (४३.०८) सातेवाडी (३७.३७), डाबेवाडी (२७.२२४), तर पारगाव तलावाची पाणीसाठवण क्षमता ३८.४७ द.ल.घ.फू इतकी आहे. सध्या यापैकी केवळ नेर व दरुज तलावात आजमितीला अनुक्रमे ३५ टक्के व १० टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, टेंभू योजनेचे सलग १६ दिवस पाणी आल्याने मायणी तलाव भरला आहे. तर बाकीच्या सर्व तलावात मृतसाठा शिल्लक राहिला असून, तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत.
फोटो-
ब्रिटिशकालीन वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या खटाव तालुक्यातील नेर तलावात आजमितीला केवळ ३५ टक्के इतकाच पाणीसाठा आला आहे.