सडावाघापूरच्या उलट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, स्थानिकांना उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 14:57 IST2022-07-19T14:56:53+5:302022-07-19T14:57:13+5:30
सडावाघापूर पठारावरून कोसळणारा (रिव्हर्स वॉटर) उलटा धबधबा अल्पावधीत प्रसिध्दीच्या झोतात

सडावाघापूरच्या उलट्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, स्थानिकांना उपलब्ध झाल्या व्यवसायाच्या संधी
हणमंत यादव
चाफळ : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अल्पावधीत प्रसिध्दीच्या झोतात आलेला सडावाघापूर पठारावरून कोसळणारा (रिव्हर्स वॉटर) उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे स्थानिक लोकांना रोजगार - व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.
पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची पाऊले वळतात ते नैसर्गिक वातावरणात असणाऱ्या डोंगर, झाडी, उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याकडे. अल्पावधीत प्रसिद्ध झालेला सडावाघापूर पठारावरील उलटा धबधबा हजारो पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पावसात भिजण्याचा आनंद, धबधब्याचे तुषार अंगावर झेलण्याचा रोमांचक क्षण अनुभवण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक पठारावर हजेरी लावत आहेत. पर्यटकांची वाढत्या गर्दीमुळे येथील स्थानिक रहिवाशांना रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे याठिकाणी अनेक कुटुंबियांनी छोटे गाळे टाकले आहेत. याठिकाणी पर्यटक खाण्याचाही आनंद घेत आहेत.
पाटण तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. डोंगर रांगा, सडावाघापूरचा धबधबा, वनकुसवडेचे विस्तीर्ण पठार, कोयना धरणासह अनेक पर्यटन स्थळे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. याठिकाणी पर्यटकांना शासनाने प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.
कायमस्वरूपी व्यवसाय मिळावा
पर्यटकांकडून चहाला प्रचंड मागणी आहे. यामुळे या व्यवसायातून कुटुंबांचा उदरनिर्वाह चांगला होत असून आर्थिक फायदा चांगला होत आहे. मात्र हंगामी व्यवसायाबरोबर कायमस्वरूपी पर्यटन विकसित होणे गरजेचे आहे. - दगडू कोंडीबा बोडके, चहा विक्रेता