पीक विमा: ज्वारीला हेक्टरी २६ तर गव्हाला ३० हजार रुपये मदत, सातारा जिल्ह्यात किती शेतकऱ्यांचा सहभाग..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 13:21 IST2024-11-28T13:21:09+5:302024-11-28T13:21:50+5:30
सातारा : अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक संकटे आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी राज्य शासनाने पीक विमा योजना ...

पीक विमा: ज्वारीला हेक्टरी २६ तर गव्हाला ३० हजार रुपये मदत, सातारा जिल्ह्यात किती शेतकऱ्यांचा सहभाग..वाचा
सातारा : अतिवृष्टी, दुष्काळ, नैसर्गिक संकटे आदी कारणाने पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी राज्य शासनाने पीक विमा योजना सुरू केली आहे. आताच्या रब्बी हंगामासाठीही एक रुपया भरुन सहभाग घेता येणार आहे. यासाठी नुकसानीस पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्याला ज्वारीसाठी हेक्टरी २६ तर गव्हासाठी ३० हजारांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
शेती करताना शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग, दुष्काळ आदींने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी ही योजना आहे. पूर्वी शेतकऱ्यांना पिकांचा विमा उतरविण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागत होती.
पण, मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा देऊ केला आहे. याचा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सातारा जिल्ह्यातही रब्बी हंगामात एक रुपयात पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना सहभाग घेता येणार आहे. उर्वरित विमा हप्ता रक्कम राज्य आणि केंद्र शासन भरणार आहे. यंदाच्या हंगामात रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, रब्बी कांदा, उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ही योजना लागू आहे.
या मुदतीत विमा नोंदणी करता येणार..
जिल्ह्यात ठराविक पिकांसाठी ही योजना आहे. यासाठी ज्वारीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत तर गहू, हरभरा आणि कांद्यासाठी १५ डिसेंबर तसेच उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत पीकविमा योजनेत सहभाग घेता येणार आहे.
पीकविमा संरक्षित रक्कम हेक्टरी रुपयात
- ज्वारी बागायत २६,०००
- ज्वारी जिरायत २०,०००
- गहू ३०,०००
- हरभरा १९,०००
- कांदा ४६,०००
- भुईमूग ४०,०००