Satara: वर्धनगड घाटातून क्रेन दोनशे फूट खाली कोसळली, क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:11 IST2025-03-10T16:10:17+5:302025-03-10T16:11:11+5:30
अपघात कसा झाला, याची माहिती उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही

Satara: वर्धनगड घाटातून क्रेन दोनशे फूट खाली कोसळली, क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी
कोरेगाव : सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड, ता. खटाव गावच्या हद्दीत घाटामध्ये रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महाकाय क्रेन घाटातून सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळली आणि पलटी झाली. यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पुसेगाव पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीशी निगडित ही क्रेन असून वर्धनगड घाटात एका वळणावर ऑपरेटरचा क्रेनवरील ताबा सुटल्याने ती सुमारे दीडशे ते दोनशे फूट खाली कोसळली आणि जागेवर पलटी झाली. यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती समजताच वर्धनगड आणि रामोशीवाडी येथील युवक कार्यकर्ते व वाहनधारकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत ऑपरेटरला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. अपघातग्रस्त क्रेन ही ऑपरेटर चालवत होता आणि तो स्वतः जखमी झाला असल्याने नेमकी क्रेन कोठून कोठे निघाली होती आणि तिचा अपघात कसा झाला, याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही.