प्रशासकीय इमारतीत नागरिकांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:09+5:302021-06-17T04:26:09+5:30

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड येथील प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिक ...

Corona test of citizens in the administrative building | प्रशासकीय इमारतीत नागरिकांची कोरोना चाचणी

प्रशासकीय इमारतीत नागरिकांची कोरोना चाचणी

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड येथील प्रशासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. या चाचणीनुसार सोमवारी ६० तर मंगळवारी ९० अशा दीडशे जणांची अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली आहे. प्रशासकीय इमारतीमध्ये काही जण कामानिमित्त येतात, तर काही जण विनाकारण या इमारतीत प्रवेश करतात. त्यामुळे इमारतीत येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य विभागाकडून चाचणी करण्यात येत असून, या चाचणीमुळे विनाकारण येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

प्रशासकीय कार्यालयात अनेक महत्त्वाचे विभाग कार्यरत आहेत. त्या विभागांमध्ये दररोज नागरिक काही ना काही काम घेऊन येत आहेत. तसेच तहसील कार्यालयही याच इमारतीत असल्यामुळे लग्नासाठी परवानगी घेण्यासाठी तालुक्यातील अनेक गावांतून लोक येत आहेत. प्रशासनातील अनेक विभागांतील अधिकारी, कर्मचारीही या ठिकाणी येत असतात. दिवसेंदिवस वाढत असलेल्या गर्दीमुळे कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्या आरोग्याच्या हितासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांची अ‍न्टिजन चाचणी करण्याचा निर्णय घेतला. दीडशे जणांची चाचणी करण्यात आली. मात्र, या चाचणीत सर्वांचे अहवाल हे ‘निगेटिव्ह’ आले आहेत.

Web Title: Corona test of citizens in the administrative building