कोरोनाने ग्रासले आता पुस्तकविक्रेत्यांनी छळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:25 IST2021-06-22T04:25:50+5:302021-06-22T04:25:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आॅनलाईन शिक्षणाची यंत्रणा घरात उभी केल्यानंतर पालकांनी शाळेची फी भरून थोडी उसंत घेतली असतानाच ...

कोरोनाने ग्रासले आता पुस्तकविक्रेत्यांनी छळले!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आॅनलाईन शिक्षणाची यंत्रणा घरात उभी केल्यानंतर पालकांनी शाळेची फी भरून थोडी उसंत घेतली असतानाच मूठभर पुस्तक विक्रेत्यांनी पालकांचा छळ मांडला आहे. पुस्तकांचे गठ्ठे बांधलेत असं म्हणून स्वतंत्र पुस्तके द्यायला दुकानदारांनी विरोध केल्याने पालक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.
जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती लक्षात घेता सध्या तरी आॅनलाईन शिक्षण घेण्याचीच प्रशासनाची मानसिकता असल्याने पालकांनी त्यांच्या सोयीने पुस्तके खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळविला. अत्यावश्यक सेवेची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत असल्याने सकाळी लवकर पुस्तके घेण्यासाठी पालक दुकानात गर्दी करत आहेत. वर्षानुवर्षे शाळेने दिलेल्या यादीनुसार पुस्तके खरेदी करणाऱ्या पालकांना यंदा चांगलीच आर्थिक झळ बसली आहे. परिणामी काही पालकांनी वरच्या वर्गातील परिचितांकडून पुस्तके कमी किमतीत घेतली. त्यातील काही खराब झालेली पुस्तके नवीन घेण्याचा मार्गही यंदा पालकांनी अवलंबला आहे.
कोविडच्या झळीतून पालकांबरोबरच पुस्तक व्यावसयिकही जात आहेत. त्यामुळे दुकानातील माल याच महिन्यात खपविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. परिणामी त्याचा सर्व ताण पुन्हा एकदा पालकांवर येत असल्याने ते हताश झाले आहेत. पहिल्या सत्राची पुस्तके तातडीने नेऊन अभ्यासाला प्रारंभ झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास दुसऱ्या सत्राची पुस्तके घेण्याचे नियोजन पालकांचे असताना दुकानदारांकडून मुलांपुढेच येणाऱ्या अरेरावीच्या भाषेने पालक त्रस्त झाले आहेत.
चौकट :
ग्राहक न्यायालयाची मात्रा उपयोगी!
सातारा शहराच्या विस्तारित भागातही पुस्तकांची विक्री स्टेशनरीच्या दुकानांमधून होत आहे. अनेक पालक आपली मागणी दुकानदारांना पाठवून घरपोहोच सेवा घेत आहेत. पण पालकांच्या मागणीपेक्षाही आपला माल खपावा अशा मानसिकतेत असलेल्या व्यावसायिकांनी दोन्ही सत्राची पुस्तके घेण्यासाठी आग्रह धरला. हा ग्राहक हक्क कायद्याचा भंग असल्याचे सांगितल्यानंतर मात्र, व्यावसायिक गरजेएवढीच पुुस्तके देत असल्याचे पालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कोट :
ग्राहकाला त्याच्या गरजेनुसार सेवा देणं हे दुकानदारांचे काम आहे. आपल्याकडे पालक संघटित नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुकानदारांची मनमानी चालते. गठ्ठे बांधलेत सुट्टी पुस्तकं देता येणार नाहीत अशी उत्तरं अयोग्य आहेत. ग्राहकाच्या मागणीनुसार पुरवठा करणं हे त्यांचे काम आहे. याविरोधात पालकांनी ग्राहक न्यायालयात दाद मागण्यास हरकत नाही.
- अॅड. संग्राम मुंढेकर, पालक