Satara: ‘कोयने’ला सर्वाधिक पावसाची नोंद; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. वाचा सविस्तर

By नितीन काळेल | Updated: June 17, 2025 19:31 IST2025-06-17T19:24:49+5:302025-06-17T19:31:17+5:30

साताऱ्यात ऊन अन् पावसाचा खेळ 

Continuous rain in the western part of Satara district, Koynanagar records highest rainfall | Satara: ‘कोयने’ला सर्वाधिक पावसाची नोंद; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. वाचा सविस्तर

Satara: ‘कोयने’ला सर्वाधिक पावसाची नोंद; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. वाचा सविस्तर

नितीन काळेल

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला सर्वाधिक १३७ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणात सुमारे ३० हजार क्युसेक वेगाने पाणी आवक होत आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा २५ ‘टीएमसी’च्या वर गेला आहे. तर सातारा शहरात सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. विशेष करून पश्चिम भागात पावसाची संततधार आहे. कास, बामणोली, तापोळा, कोयना, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. यामुळे रानमाळावरून पाणी खळाळू लागले आहे. तसेच ओढे आणि नालेही भरून वाहू लागलेत. भात खाचरात पाणी साचले आहे. तर या पावसामुळे भात लागणीलाही वेग येणार आहे.

पाटण तालुक्यातही पाऊस वाढला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १३७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे १२५ आणि महाबळेश्वरलाही १२८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम भागातील या पावसामुळे प्रमुख धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक अधिक होऊ लागली आहे.

मंगळवारी सकाळच्या सुमारास २९ हजार ८८५ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात २५.१२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण २३.८७ इतके आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ३८८, नवजा येथे ३६६ आणि महाबळेश्वरला ३२४ मिलिमीटर पर्जन्यमान झालेले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे.

Web Title: Continuous rain in the western part of Satara district, Koynanagar records highest rainfall