सातारा पालिकेत दोन्ही राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा बसणार? महाविकास आघाडीबाबत विचारमंथन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 14:11 IST2022-06-16T14:08:52+5:302022-06-16T14:11:31+5:30
सातारा पालिकेची होऊ घातलेली निवडणूक रंगतदार होणार असून, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सातारा पालिकेत दोन्ही राजेंच्या सत्ताकेंद्राला हादरा बसणार? महाविकास आघाडीबाबत विचारमंथन
सातारा : सातारा पालिकेच्या रणांगणात शड्डू ठोकण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सातारकरांना तिसरा पर्याय देण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.
सातारकरांसाठी आजवर तिसरा पर्याय उभा न राहिल्याने राजधानीतील निवडणुकीचा सामना राजे विरुद्ध राजे असाच रंगत आला आहे. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही राजे भाजपवासी झाल्याने पालिकेचा गड काबीज करण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व अपक्षांनीदेखील मोट बांधली आहे. साताऱ्यात मंगळवारी आ. शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याची प्रचिती आली.
साताऱ्यातील अनेक प्रश्न आजवर सुटलेले नाहीत. जनतेला पायाभूत सेवासुविधा उपलब्ध होत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी, जनतेच्या विकासासाठी, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी यंदा तिसरा पर्याय निर्माण करणे गरजेचे असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. या मागणीला सर्वांनीच दुजोरा दिला. या निर्णयामुळे सातारा पालिकेची होऊ घातलेली निवडणूक रंगतदार होणार असून, खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले काय रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबर, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, ज्ञानदेव कदम, विजय निकम, प्रा. विक्रांत पवार, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, प्रणव सावंत, अमय गायकवाड, गिरीश मोडकर, स्नेहा अंजलकर, सलीम कच्छी, अमित कदम, अमृता पाटील आदी उपस्थित होते.