सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 13:43 IST2019-08-25T13:34:05+5:302019-08-25T13:43:16+5:30
जागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथीओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांचे वर्चस्व
सातारा/पेट्री - जागतिकस्तरावर दखल घेतलेल्या सातारा रनर्स फाऊंडेशनच्या आठव्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये यंदा इथिओपिया आणि केनियाच्या स्पर्धाकांनी वर्चस्व गाजवले. या स्पर्धेत देश, परेदशातील सुमारे आठ हजारजण धावले.
साताऱ्यातील पोलीस कवायत मैदान ते कास रस्त्यावरील प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या पुढे दोनशे मीटर अंतर व पुन्हा पोलीस कवायत मैदान अशी २१ किलोमीटर अंतराची सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शौर्यपदक विजेते सुभेदार त्रिभुवनसिंग, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, रनर्स फाऊंडेशन अध्यक्ष प्रताप गोळे, सचिव जितेंद्र भोसले, संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, अॅड. कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष डॉ. सुचित्रा काटे यांच्यासह रनर्स फाऊंडेशनच्या सदस्यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले.
सकाळी बरोबर सहा वाजता झेंडा दाखवताच स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धकांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच जागोजागी आरोग्य पथकाच्या रूग्णवाहिकाही सज्ज होत्या. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा मार्गाच्या दुतर्फा सातारकरांनी गर्दी केली होती.