Satara: खते बनवण्याच्या नावाखाली अमली पदार्थांचा साठा, कऱ्हाडच्या तासवडे औद्योगिक वसाहतीत ६ कोटींचे कोकेन जप्त
By प्रमोद सुकरे | Updated: May 23, 2025 14:28 IST2025-05-23T14:27:10+5:302025-05-23T14:28:24+5:30
तपास सुरू, आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यता

Satara: खते बनवण्याच्या नावाखाली अमली पदार्थांचा साठा, कऱ्हाडच्या तासवडे औद्योगिक वसाहतीत ६ कोटींचे कोकेन जप्त
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीमध्ये खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून कोकेनसारख्या घातक अमली पदार्थांचा साठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तळबीड पोलिसांनी शुक्रवारी (२३ मे) अत्यंत गोपनीयपणे केलेल्या कारवाईत ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ या कंपनीमधून तब्बल १२७० ग्रॅम कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारमूल्याने याची किंमत सुमारे ६ कोटी ३५ लाख रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली.
कंपनी मालक अमरसिंह जयवंत देशमुख राहणार नांदगाव, समीर सुधाकर पडवळ ( वृंदावन सिटी मलकापूर कराड), रमेश शंकर पाटील (मल्हारपेठ ता. पाटण,) जीवन चंद्रकांत चव्हाण ( आवार्डे ता. पाटण) विश्वनाथ शिपणकर (दौंड जिल्हा पुणे) यांच्याविरुद्ध अंमली औषधी द्रव्य अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
कंपनीच्या नावाखाली अमली पदार्थांचा साठा
तासवडे एमआयडीसीमधील बी-५६ ब्लॉकमध्ये ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ ही कंपनी आहे. ही कंपनी शेतीसाठी खते तयार करते. असा मुखवटा वापरून तिथे अवैधपणे कोकेनचा साठा केला जात होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर त्यांनी तातडीने नियोजनबद्ध कारवाई केली आणि कंपनीवर छापा टाकला. या वेळी अति सावधगिरीने परिसराची झडती घेण्यात आली. छाप्यात पांढऱ्या रंगाच्या पावडरच्या स्वरूपात १२७० ग्रॅम कोकेन मिळून आले, जे तांत्रिक चाचणीद्वारे कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.
तपास सुरू, आंतरराष्ट्रीय टोळीची शक्यता
या कारवाईनंतर पोलिसांनी कंपनीतील संबंधित पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे कोकेन कुठून आणले गेले, कोणत्या मार्गाने आणि कोणत्या हेतूने येथे साठवले गेले, याचा तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातात सापडलेल्या पुराव्यांवरून हे कोकेन विक्रीसाठी बाळगण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. यामध्ये आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.