Satara: फलटणमध्ये नामांतर प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; नगरपालिकेत बहुमताने ठराव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:36 IST2026-03-26T19:36:15+5:302026-03-26T19:36:31+5:30
हद्दवाढ प्रस्तावात जाधववाडी परिसर

Satara: फलटणमध्ये नामांतर प्रस्तावावरून सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; नगरपालिकेत बहुमताने ठराव मंजूर
फलटण : पालिका इमारती व सभागृहांचा नामांतर प्रस्ताव फलटण पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. मात्र यामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे महापुरुषांची नावे देण्यावरून. या विषयावर सत्ताधारी व विरोधी गटात तीव्र खडाजंगी झाली. विरोधी सदस्यांनी पूर्वीची नावे बदलू नयेत, अशी भूमिका घेतली तर सत्ताधाऱ्यांनी महापुरुषांच्या नावांचा सन्मान करण्याची भूमिका मांडली. नगराध्यक्षांनी हा विषय सर्वसामान्यांच्या भावनांशी निगडित असल्याचे सांगत महापुरुषांचे योगदान अधोरेखित केले. अखेर हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
फलटण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि. २५) नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेस नगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी खासदार गट व विरोधी राजे गटातील सर्व नगरसेवकांनी सभेत सहभाग नोंदवला.
सभेत एकूण ४६ विषयांवर चर्चा झाली. पहिल्या विषयात सन २०२६-२७ साठी विविध विभागांच्या वार्षिक निविदा मागविण्याचा प्रस्ताव सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतील कामांवर चर्चा करताना विकास काकडे यांनी त्यांच्या प्रभागात कमी कामे झाल्याची तक्रार मांडली. त्यावर नगराध्यक्षांनी मागणी न केल्यामुळे प्रभाग मागे राहिल्याचे स्पष्ट केले. उपसूचना मतदानात नाकारण्यात आली.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतील कामांवर चर्चा करण्यात आली. काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी थेट उत्तर द्यावे, अशी मागणी केली. ‘नमो उद्यान’ उभारणीच्या विषयावर चर्चा करताना स्मिता शहा यांनी वनविभागाच्या जागेचा विचार करावा, अशी सूचना केली.
नगराध्यक्षांनी त्या प्रक्रियेस वेळ लागेल, असे सांगितले. पेठ मंगळवार येथील बुद्धविहार दुरुस्तीचा विषय सर्वांनुमते मंजूर करण्यात आला. शहर विकास आराखड्याच्या विषयावर पंकज पवार यांनी झोपडपट्टी भागालाही निधी द्यावा, अशी सूचना केली. पप्पू शेख यांनी विरोधी सदस्यांचे मत ऐकले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्षांनी सर्व रस्ते सहा महिन्यांत सुधारण्याचे आश्वासन दिले.
हद्दवाढ प्रस्तावात जाधववाडी परिसर
शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर जाधववाडी परिसर प्राधान्याने समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली. फरांदवाडी येथील जागेवर स्टेडियम उभारणीचा विषयही चर्चिला गेला. विविध विकासकामांसाठी जमीन खरेदी, मनुष्यबळ उपलब्धता, कार्यालयीन सुधारणा, दिव्यांगांसाठी निधी वितरण अशा विषयांवरही चर्चा करण्यात आली.
थकीत गाळ्यांची जप्ती व फेरलिलाव, स्वीमिंग पूल भाडेतत्त्वावर निर्णय..
शहरात नवीन शौचालये बांधणे, भुयारी गटार योजनेसाठी जागा खरेदी, विविध योजना राबविणे, एलएएन प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षारक्षक नेमणूक, वाहन खरेदी, बाजार व्यवस्थापन, वकील व आर्किटेक्ट नेमणूक, थकीत गाळ्यांची जप्ती व फेरलिलाव, स्वीमिंग पूल भाडेतत्त्वावर देणे अशा अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले.