बुरखा घालून चेन स्नॅचिंग; साताऱ्यात तरुणांच्या मुसक्या आवळल्या

By नितीन काळेल | Updated: April 5, 2025 19:25 IST2025-04-05T19:24:20+5:302025-04-05T19:25:38+5:30

पुणे जिल्ह्यात पाठलाग करून संशयिताला पकडले

Chain snatching while wearing a burkha Two youths arrested in Satara | बुरखा घालून चेन स्नॅचिंग; साताऱ्यात तरुणांच्या मुसक्या आवळल्या

बुरखा घालून चेन स्नॅचिंग; साताऱ्यात तरुणांच्या मुसक्या आवळल्या

सातारा : बुरख्याचा वेश परिधान करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविणाऱ्याच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या. पुणे जिल्ह्यात पाठलाग करून संशयिताला पकडण्यात आले. या प्रकरणात शहर पोलिसांनी संशयितांकडून धारदार हत्यारे, बुरखा, दुचाकी, मोबाइल, चोरीचे दागिने जप्त केले आहेत. संशयित दोघेही सातारा शहरातीलच रहिवासी आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, सातारा शहर पोलिसांनी याप्रकरणी अब्दुल इमाम सय्यद (वय २८, रा. ग्रीन सीटी अपार्टमेंट, शाहूनगर सातारा), आफताब सलीम शेख (वय २४, रा. मंगळवार पेठ, सातारा) यांना अटक केली आहे. दरम्यान, ९ मार्चला सातारा शहरातील शाहूनगर भागात एका दुकानात दुचाकीवरून दोन व्यक्ती आलेल्या होत्या. त्यातील एकाने पूर्ण शरीर झाकेल, असा काळ्या रंगाचा बुरखा घातलेला. दुसरा काही अंतरावर दुचाकीवर बसून होता.

बुरखा घातलेल्याने दुकान मालक महिलेशी किराणामालाची विचारपूस करत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद आहे. त्याचबरोबर १ एप्रिललाही रात्री ११ च्या सुमारास सत्यमनगरात दोन तरुणांनी धारदार हत्याराने दहशत माजवून चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या होत्या, तसेच माैल्यवान ऐवजाची चोरी केलेली.

याप्रकरणीही सातारा शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक संशयितांचा शोध घेत हेाते. यादरम्यान, शाहूनगरात मंगळसूत्र हिसकावणारी बुरखाधारी ही महिला नसून, तो पुरुष असल्याचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यावर हालचालीवरून लक्षात आले. यानंतर पोलिसांनी रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी केली, तेव्हा गोपनीय काही माहिती मिळाली.

साताऱ्यात गुन्हा केल्यानंतर संबंधित तरुण पुणे जिल्ह्यातील सुपा, ता. बारामती येथे पळून गेल्याची माहितीही मिळाली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने संशयिताला पकडण्यासाठी सापळा लावला. त्यावेळी संशयित चाैफुला रस्त्याने दुचाकीवरून पळून जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनीही चारचाकी वाहन आडओ लावले, तरीही संशयित हे दुचाकी टाकून पळू लागल्याने पोलिसांनी पाठलाग सुरू केला. तसेच, त्यांना पकडले.

चाैकशी केल्यावर सुरुवातीला चुकीची उत्तरे दिली. पण, काैशल्यपूर्वक तपास केल्यावर त्यातील एकाने एका सहकाऱ्यासोबत महिलेचा बुरखा घालून शाहूनगरात मंगळसूत्र हिसकावून नेल्याचे कबूल केले, तसेच वाहनांचीही तोडफोड एका सहकाऱ्यासोबत केल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली आहे.

Web Title: Chain snatching while wearing a burkha Two youths arrested in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.