कराड : ओढ्यावरील पाणी विहिरीत सोडण्यासाठी काढलेल्या दहा ते बारा फूट खोल चरीमध्ये सिमेंटचे पाइप जोडण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांचा अंगावर मलबा पडल्याने गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उंडाळे येथील ठाकराची मळी नावाच्या शिवारात घडली. किरण बाजीराव चव्हाण (वय ३०) आणि अमर रंगराव वडार (३०, दोघेही रा. मनव, ता. कराड) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी एकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संदीप श्रीरंग पाटील, रा. उंडाळे, (ता. कराड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उंडाळे-मनव रस्त्यावरील ठाकराची मळी शिवारात उंडाळेतील शेतकरी श्रीरंग पाटील यांच्या शेताजवळील ओढ्यातील पाणी विहिरीत सोडण्यासाठी शनिवार सकाळपासून जेसीबीने दहा ते बारा फूट खोल चर काढण्याचे काम सुरू होते. चर काढून झाल्यानंतर त्यामध्ये सिमेंटचे पाइप टाकण्याचे काम करण्यात येणार होते. यासाठी मनव येथील किरण चव्हाण आणि अमर वडार यांना सिमेंटच्या पाइप लाइन जोडण्याचे काम देण्यात आले होते.
चर काढून झाल्यानंतर जेसीबी ऑपरेटर आणि इतर कामगार झाडाच्या सावलीत जेवण्यासाठी थांबले होते. त्यांनी करण आणि अमर यांनाही जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबून पाइप टाकू या असे सांगितले होते. मात्र, दुसऱ्या ठिकाणी काम असल्यामुळे लवकर जायचे असल्याने दोघांनी कोणालाही न सांगता काढलेल्या चरीमध्ये सिमेंटचे पाइप जोडण्यासाठी प्रवेश केला. यावेळी अचानक वरून मलबा कोसळून तो दोघांच्या अंगावर पडला. त्यामुळे त्यांचा श्वास गुदमरून जागीच मृत्यू झाला.दरम्यान, मृत्यू झाल्यानंतर रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास उंडाळे ग्रामीण रुग्णालयातून कराडला शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.
Web Summary : Two men died in Undale after being buried alive while fitting pipes in a trench. Sandeep Patil booked for negligence leading to their suffocation and death. Police are investigating.
Web Summary : उंडाले में खाई में पाइप लगाते समय दो लोगों की दबकर मौत हो गई। लापरवाही के कारण संदीप पाटिल पर मामला दर्ज। पुलिस मामले की जांच कर रही है।