ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह तीस तासांनी आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 19:17 IST2020-11-11T19:15:44+5:302020-11-11T19:17:08+5:30
police, sataranews, crimenews वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह विहीरीत कोसळलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल तीस तासांनी यश आले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. तसेच शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह तीस तासांनी आढळला
कोपर्डे हवेली : वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह विहीरीत कोसळलेल्या चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल तीस तासांनी यश आले. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. तसेच शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
हणमंत पांडुरंग झोंबरे (वय ३५, रा. बीड) असे त्या चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत शुगर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर हणमंत झोंबरे हा युवक चालक म्हणून कामास होता. सोमवारी सकाळी तो वडोली निळेश्वर येथे ऊस भरण्यासाठी गेला होता. ऊस भरल्यानंतर तो ट्रॅक्टर घेऊन कारखान्याकडे निघाला. मात्र, करवडी रस्त्यानजीक असलेल्या विहीरीजवळ ट्रॉलीचा टायर घसरून ऊसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहीरीत कोसळला. त्यामध्ये हणमंतही विहीरीत बुडाला.
सोमवारी सायंकाळी ट्रॅक्टर ट्रॉली विहीरीतून बाहेर काढण्यात आली. मात्र, हणमंतचा मृतदेह आढळून आला नव्हता. दोन पंपांनी विहीरीतील पाणी ऊपसा करण्यात आला. अखेर मंगळवारी दुपारी पाणी कमी झाल्यानंतर मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.