लोकमत न्यूज नेटवर्क, बामणोली : कोयना धरणाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात सावरी-सोनाट पुलानजीक बुधवार (दि.१३) बोट दुर्घटना घडली होती. यामध्ये वादळी वाऱ्यात पलटी झालेल्या बोटीत मुंबईचे पर्यटक दांम्पत्य पोहून सुरक्षित बाहेर निघाले होते. मात्र बोट चालक बेपत्ता झाला होता. दरम्यान बेपत्ता बोट चालकाचा मृतदेह गुरुवार (दि.१४) दुपारी १२.३० च्या सुमारास सापडला.
रुपेश धोंडीबा तांबे (वय ४५, रा. तापोळा) असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे तापोळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार वळीव पावसामुळे कोयना जलाशयात मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. यावेळी पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीड बोट अचानक पलटी झाली. बोटीत मुंबई येथील दांम्पत्यासह चालक रुपेश तांबे होते. दुर्घटनेनंतर दांम्पत्याने लाईफ जॅकेटच्या साहाय्याने पोहत सुरक्षित किनारा गाठला. मात्र चालक रुपेश तांबे हे बुडाले होते.
घटनेनंतर स्थानिक नागरिक, बोट व्यावसायिक तसेच शिवसागर बोट क्लबचे चेअरमन आनंद धनावडे यांच्या माध्यमातून शोध कार्य सुरू होते. अखेर गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जलाशयात बुडालेल्या अवस्थेत रुपेश तांबे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, कोयना जलाशय परिसरातील सर्व बोट चालक व व्यावसायिकांनी पर्यटकांच्या तसेच स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाईफ जॅकेटमुळे वाचले पर्यटकांचे प्राण..
वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसाने महाबळेश्वर तालुक्यात अक्षरशः हाहाकार उडवला. तापोळा येथे बोट दुर्घटना घडली. मात्र बोटीतील दांम्पत्याने लाईफ जॅकेट परिधान केले असल्याने ते बचावले.
Web Summary : Tapola boat accident: The missing boat driver's body was found in Koyna reservoir. A tourist couple survived due to life jackets after the boat capsized in a storm. The deceased driver was identified as Rupesh Tambe, age 45.
Web Summary : तपोला नाव दुर्घटना: लापता नाव चालक का शव कोयना जलाशय में मिला। तूफान में नाव पलटने के बाद लाइफ जैकेट की मदद से एक पर्यटक दंपति बच गया। मृतक चालक की पहचान रूपेश तांबे (उम्र 45) के रूप में हुई।