अजबच कारभार; सातारा शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, दुसऱ्यावरच केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:38 IST2026-04-01T12:38:28+5:302026-04-01T12:38:48+5:30

महिनाभरात दुसरी घटना; नातेवाइकांकडून तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी

Bodies swapped at Satara Government Hospital; cremation performed on someone else's body | अजबच कारभार; सातारा शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, दुसऱ्यावरच केले अंत्यसंस्कार

अजबच कारभार; सातारा शासकीय रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, दुसऱ्यावरच केले अंत्यसंस्कार

सातारा : साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात महिनाभरात दुसऱ्यांदा मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. विशेष म्हणजे एका कुटुंबाने चुकून दुसऱ्याच मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने रुग्णालयासमोर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील आनंद सुनील ओव्हाळ (वय २६) याने दि. २३ मार्च रोजी विष प्राशन केले होते. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सातारा तालुक्यातील आरळे येथील सुरेश मस्कू खोमणे (वय ५१) हेदेखील गेल्या तीन दिवसांपासून सिव्हिलमध्ये उपचार घेत होते. त्यांचाही मंगळवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोन्ही मृतदेहांचे बुधवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पार पाडली. मात्र, याचवेळी गंभीर निष्काळजीपणा झाल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली. परिणामी, एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकारामुळे संबंधित कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नातेवाइकांनी केली.

एकाच विभागात दोघांवर उपचार

मृत आनंद ओव्हाळ आणि सुरेश खोमणे या दोघांवर एकाच अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दोघांचाही रात्री मृत्यू झाल्यानंतर वाॅर्डमधून त्यांच्या कपाळावर नावाचे लेबल लावून शवागृहात मृतदेह पाठवले. लेबलची अदलाबदल किंवा मृतदेह न दाखवता नातेवाइकांच्या ताब्यात दिल्यानेच हा सारा प्रकार घडला असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.

रुग्णालयासमोर तणाव; ठिय्या आंदोलन

या प्रकारानंतर वाईहून मोठ्या संख्येने लोक शासकीय रुग्णालयामध्ये आले. नातेवाइकांना चेहरा न दाखवताच मृतदेह ताब्यात देण्यात आल्याचा आरोप करत नातेवाइकांनी शवविच्छेदन खोलीबाहेर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतली. मात्र, जमाव आपल्या भूमिकेवर ठाम होता. रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सिव्हिलसमोर कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title : सतारा अस्पताल में गड़बड़ी: शव बदले, गलत अंतिम संस्कार, हंगामा

Web Summary : सतारा अस्पताल की लापरवाही से शवों की अदला-बदली हुई, जिसके चलते एक परिवार ने अनजाने में गलत व्यक्ति का अंतिम संस्कार कर दिया। रिश्तेदारों ने विरोध प्रदर्शन किया और जवाबदेही की मांग की। तनाव और पुलिस की मौजूदगी के बीच जांच जारी है।

Web Title : Satara Hospital Mix-Up: Bodies Swapped, Wrong Funeral Held, Chaos Ensues

Web Summary : Satara hospital's negligence led to a body mix-up, resulting in one family unknowingly cremating the wrong person. Relatives protested, demanding accountability. An investigation is underway amidst heightened tensions and police presence.