एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 20:29 IST2025-12-06T20:09:25+5:302025-12-06T20:29:19+5:30
Shambhuraj Desai : मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आम्ही सत्तेमध्येच होतो. आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती.

एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
प्रमोद सुकरे
सन २०२२ मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी युती टिकवण्यासाठी उठावाची भूमिका घेतली. त्यामुळेच सत्तेबाहेर असलेले भाजपा पुन्हा सत्तेत आले. भाजपाला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला. त्यामुळे भाजपा शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली. पर्यायाने भाजपा ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठावच कारणीभूत असल्याचं मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलं. मरळी ता.पाटण येथे शनिवारी माध्यमांशी मंत्री देसाई यांनी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी भाजप शिवसेना युतीच्या बाबतीत भाष्य केलं.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, खरंतर आम्ही सत्तेमध्येच होतो. आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. त्यात पुढे काय होणार आहे? बहुमत होणार आहे का नाही? युती टिकणार आहे की नाही? याचा आम्ही विचार केला नाही. त्यामुळे या गोष्टीचा भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा असा सल्लाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणतात त्याप्रमाणे सन २०१४ पर्यंत खरच भाजपा राज्यात तेवढी ताकदवान नव्हती. त्यानंतर जी राजकीय स्थित्यंतरे झाली त्याकडे लोढा यांनी मागे वळून पाहिले पाहिजे असंही देसाई म्हणाले.
"म्हणून सत्तेतून बाहेर पडलो.."
खरंतर आम्ही राज्यात सत्तेतच होतो. पण शिवसेना-भाजपाची युती अधिक भक्कम व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सत्तेतून बाहेर पडलो असं मंत्री देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.