साताऱ्यात 'पक्षचिन्ह' अन् नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अडले घोडे
By सचिन काकडे | Updated: November 7, 2025 19:31 IST2025-11-07T19:30:40+5:302025-11-07T19:31:32+5:30
Local Body Election: आघाडीत नाही रस : पक्षचिन्हावर निवडणुकीसाठी आग्रही

साताऱ्यात 'पक्षचिन्ह' अन् नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अडले घोडे
सचिन काकडे
सातारा : नगरपालिका निवडणुकीची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना, साताऱ्यातील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा गुंता अजूनही सुटलेला नाही. राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाने यंदा सातारा नगरपालिकेची निवडणूक थेट ‘पक्ष चिन्हावर’ लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याबाबत साताऱ्यातील दोन्ही आघाड्यांकडून अद्याप निर्णय न झाल्यानेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा गुंताही सुटलेला नाही.
भाजपची नवीन खेळी ?
- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपने आपली क्षमता वाढविली आहे. जिल्ह्यात आठपैकी चार आमदार आणि खासदारपद भाजपकडे आहे. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते साताऱ्याच्या राजकारणाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. दोन ‘राजें’चे सत्ताकेंद्र असलेल्या या पालिकेवर भाजप विचाराचा नगराध्यक्ष निवडून यावा, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे.
- भाजपने नगराध्यक्षपदासाठी ‘एका’ नावाचा विचार केल्याची चर्चा आहे, मात्र ते नाव अद्याप गोपनीय आहे.
- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी, ‘पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीने नगरपालिकेचा निर्णय घेतला जाईल,’ असे सूचक विधान करत अधिक बोलणे टाळले आहे. यामुळे भाजपच्या या राजनीतीला जाणकारांकडून दुजोरा मिळत आहे.
पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांचा ‘फॅक्टर’
- जिल्ह्यातील पालिकांचा आजवरचा इतिहास पाहता, बहुतांश निवडणुका या राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून लढविल्या गेल्या आहेत; कारण हाच फॉर्म्युला निवडणुकीत यशस्वी होत आला आहे. त्यामुळे यंदाही उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीतील पदाधिकारी ‘स्थानिक’ पातळीवर निवडणूक लढविण्यास अनुकूल आहेत.
- येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना गती येणार असून, सातारा नगरपालिकेची निवडणूक पक्ष चिन्हावर होणार की स्थानिक आघाड्या जागांची वाटाघाटी करून ‘मैत्रीपूर्ण लढत’ देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, भाजपची भूमिकाही तितकीच निर्णायक ठरणार आहे.