'भाजप'ची संधी, 'काँग्रेस'ची जबाबदारी कोणाला?; सातारा जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान
By प्रमोद सुकरे | Updated: April 12, 2025 13:18 IST2025-04-12T13:17:53+5:302025-04-12T13:18:23+5:30
प्रमोद सुकरे कऱ्हाड: सध्या जिल्ह्यातील प्रमुख दोन राजकीय पक्षात जिल्हाध्यक्ष निवडी बाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने संघटन पर्व ...

'भाजप'ची संधी, 'काँग्रेस'ची जबाबदारी कोणाला?; सातारा जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: सध्या जिल्ह्यातील प्रमुख दोन राजकीय पक्षात जिल्हाध्यक्ष निवडी बाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने संघटन पर्व २ नुसार स्थानिक पातळीपासून सर्व निवड प्रक्रिया सुरू केलेल्या आहेत. त्यात तालुकाध्यक्षांंबरोबर जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियाही होणार आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात पुन्हा उभारी घेण्याच्या दृष्टीने 'काँग्रेस'मध्येही जिल्हाध्यक्ष बदलाचे वारे सुरू आहे. त्यामुळे भाजपात जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाला संधी मिळणार तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी कोणाला देणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
एकेकाळी सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. तर आता जिल्ह्यात भाजप सगळ्यात प्रबळ पक्ष ठरला आहे. खासदार उदयनराजे भोसले हे भाजपचेच आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे साहजिकच मजबूत पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. पण पक्ष नेमकी कोणाला संधी देणार? हे पाहावे लागणार आहे.
दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था खूपच बिकट झाली आहे. जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार व खासदार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसला उभारी देण्याची गरज आहे. ती उभारी देऊ शकेल असा चेहरा शोधून त्याला ही जबाबदारी देण्याची भूमिका पक्षातील नेत्यांची आहे. पण अशा बिकट परिस्थितीत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी कोण स्वीकारणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
भाजप कोणाला संधी देईल?
कराड उत्तर मधील भाजप नेते धैर्यशील कदम हे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. गत लोकसभा व विधानसभा निवडणूकांत जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळाले आहे. आता भाजप मजबूत पक्ष झाला आहे.अशावेळी पक्ष जिल्हाध्यक्ष पदाची संधी नेमकी कोणाला देणार? हे पहावे लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार विद्यमान अध्यक्ष धैर्यशील कदम हे अजून एकदा संधी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर सुनील काटकर, जयकुमार शिंदे, रामकृष्ण वेताळ यांचीही नावे चर्चेत आहेत. यापूर्वी कराड तालुक्याने अनेक वर्ष भाजपचे जिल्हाध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यामुळे आता भाजप नक्की कोणाला संधी देणार ? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेस कोणाला देणार संधी?
सातारा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाला खूप मोठी परंपरा आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद यापूर्वी सांभाळलेले आहे. तर सध्या पुसेगाव चे डॉ. सुरेश जाधव हे अध्यक्षपद सांभाळात आहेत. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर डॉ. जाधव ही जबाबदारी कायम ठेवायला उत्सुक नाहीत. काही दिवसापूर्वी पक्ष निरिक्षकांच्या समोर देखील त्यांनी मला यातून मुक्त करावे अशी विनंती केल्याचे समजते. त्यामुळे आता काँग्रेस ही जबाबदारी दुसऱ्या कोणाला सोपवणार? हे पहावे लागणार आहे. सध्या तरी रणजीत देशमुख, बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, अजितराव पाटील - चिखलीकर,नरेश देसाई अशी काही नावे चर्चेत असल्याचे समजते.
खरंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडी वेळीही नाव निश्चित करताना बराच कालावधी गेला. अनेक नावे समोर आली पण प्रत्यक्ष जबाबदारी घ्यायला कोणी पुढे सरसावले नाही. शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर ती जबाबदारी टाकण्यात आली. तसेच सध्या सातारा जिल्हाध्यक्षपद स्वीकारण्यासाठी देखील कोणी स्वतःहून पुढे येईल अशी सध्या तरी परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे ही जबाबदारी कोणावर टाकली जाईल हे माहित नाही.
त्याचाही फटका बसणार..
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 'घड्याळ' लवकरच हातात बांधणार आहेत. त्यामुळे त्याचाही फटका जिल्हा काँग्रेसला बसणार आहे हे नक्की.