Local Body Election: सातारा जिल्ह्यात भाजपचा बिनविरोध नगरसेवकांचा ‘षटकार’, विरोधकांना दिला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:29 IST2025-11-19T18:29:33+5:302025-11-19T18:29:45+5:30
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार कोण?.. वाचा

छाया-माणिक डोंगरे
सातारा / मलकापूर : सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असताना, भाजपने मंगळवारी विरोधकांना मोठा राजकीय धक्का दिला. मलकापूर आणि सातारा या दोन पालिकांमध्ये एकूण सहा जागांवर निवडणुकीपूर्वीच भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. अर्ज छाननीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपने हा ‘राजकीय षटकार’ मारला आहे.
जिल्ह्यातील नऊ पालिका व एका नगरपंचायतीसाठी यंदा निवडणूक होत आहे. या पालिकांसाठी सोमवारी भाजप, राष्ट्रवादी, शिंदेसेना, कॉंग्रेस, तसेच अपक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी या अर्जांची ज्या - त्या पालिका कार्यक्षेत्रात छाननी करण्यात आली. मलकापुरात उमेदवारी अर्जांच्या छाननी वेळी दोन प्रभागांतील चार जागांसाठी चारच अर्ज शिल्लक राहिले. एका प्रभागात दोनपैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. त्यामुळे या तीन प्रभागात भाजप चिन्हावर निवडणूक लढविणारे पाच उमेदवार बिनविरोध झाले.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या सातारा पालिकेच्या प्रभाग क्रमांक २० अ मधून भाजपच्या आशा किशोर पंडित यांनी अर्ज दाखल केला होता. या प्रभागात अन्य कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या गळ्यातही नगरसेवकपदाची माळ पडली आहे. या सहा उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असले, तरी त्यांच्या नावांची अधिकृत घोषणा बुधवार (दि. ३) रोजी निकालाच्या दिवशी होणार आहे.
कार्यकर्त्यांकडून आतषबाजी
निवडणुकीचे रण पेटण्यापूर्वीच भाजपच्या सहा उमेदवारांना बिनविरोधची लॉटरी लागल्याने मलकापूर व सातारा येथील भाजप पदाधिकारी व समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. दोन्ही ठिकाणी फटाक्यांची आषतबाजी करत उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आल्या.
बिनविरोध उमेदवार कोण?
मलकापूर : प्रभाग ७ - हणमंत निवृत्ती जाधव व सुनीता राहुल पोळ, प्रभाग ९ - ज्योत्स्ना अभिजीत शिंदे व दीपाली विजयकुमार पवार, प्रभाग ४ - सुनील प्रल्हाद खैरे
सातारा : प्रभाग २० - आशा किशोर पंडित