Satara: 'सह्याद्री'च्या निकालानंतर 'बॅलेट पेपर' पुन्हा चर्चेत!; रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचले, म्हणाल्या..
By प्रमोद सुकरे | Updated: April 10, 2025 12:24 IST2025-04-10T12:24:37+5:302025-04-10T12:24:48+5:30
ईव्हीएम मशीन मतदान प्रक्रियेवर समाज माध्यमातून टिकेची झोड

Satara: 'सह्याद्री'च्या निकालानंतर 'बॅलेट पेपर' पुन्हा चर्चेत!; रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचले, म्हणाल्या..
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: गत ४ महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत सुमारे ४० हजारावर मतांनी पराभूत झालेल्या बाळासाहेब पाटीलांनी नुकत्याच झालेल्या सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन केला. त्यामुळे सध्या त्यांचे सर्वत्र अभिनंदन सुरू आहे. अशातच दुसरीकडे 'ईव्हीएम' मशीन वरील आक्षेप आणि 'बॅलेट पेपर' वरील मतदान पुन्हा चर्चेत आले आहे. सार्वजनिक निवडणुका देखील बॅलेट पेपरच झाल्या पाहिजेत अशा भावना आता समाज माध्यमातुन मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागल्या आहेत.
खरंतर लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील रोष व्यक्त करीत मतदारांनी आघाडीला चांगले यश दिले. साहजिकच आघाडीला चांगले वातावरण असल्याच्या चर्चा सुरू असतानाच काही महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले. या लाटेत कराड उत्तरेत देखील 'कमळ' फुलले. पण महायुतीला मिळालेल्या या यशामुळे पुन्हा 'ईव्हीएम' मशीन मतदानावरील शंका सुरू झाल्या. याबाबत काहीनी तर न्यायालयात धाव घेतली होती. थोडक्यात तेव्हापासून ईव्हीएम मशीन वरील शंका आणि बॅलेट पेपर वरील मतदानाची मागणी कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे.
नुकतीच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. त्यात बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले. अन् विधानसभेला पराजित झालेल्या बाळासाहेब पाटलांची भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे व भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या दोन स्वतंत्र पॅनेलचा पराभव करीत मोठ्या फरकाने विजयी मिळविला. सह्याद्रीतील विजयानंतर झालेल्या विजय सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून बॅलेट पेपरवर हे मतदान झाले अन खरा निकाल लागला असे म्हणत विधानसभेच्या ईव्हीएम मशिन वरील मतदार बोट ठेवले.तर काहींनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत भाषणे केली.त्याला उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवत दाद दिली.
आता तोच धागा पकडत गेल्या ४ दिवसापासून समाज माध्यमातुन ईव्हीएम मशीनवर झोड उठवली जात आहे. तर बॅलेट पेपरवरच मतदान झाले पाहिजे अशा भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत. आता यातून निष्पन्न काय होणार हे माहित नाही .पण बॅलेट पेपर वरील मतदान प्रक्रिया पुन्हा चर्चेत आली आहे हे मात्र नक्की.
रोहिणी खडसेंचे ट्विट
रोहिणी खडसेंनीही केले ट्विट सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुक निकालानंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यात खासदार रोहिणी खडसे या देखील आहेत.त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात 'चार महिन्यांपूर्वी ५० हजार मताधिक्याने जिंकलेला भाजपचा एक आमदार बॅलेट पेपरवर घेतलेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीमध्ये विजयी उमेदवारांच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही' असे म्हटले आहे. आता त्यांचे हे ट्विट देखील सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
गड राखल्याने चर्चा सुरू
सहकारी संस्थातील निवडणुका या नेहमीच मतपत्रिकेवर झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने सह्याद्री कारखान्याची ही निवडणूक झाली. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर सहकारी साखर कारखान्याची झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. त्या निवडणुकीत शरद पवारांच्या शिलेदाराने गड राखल्याने या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.