राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोळसकर, वर्षात दुसरा अध्यक्ष
By नितीन काळेल | Updated: October 23, 2024 16:51 IST2024-10-23T16:51:19+5:302024-10-23T16:51:46+5:30
संजीवराजे शरद पवार गटात

राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सोळसकर, वर्षात दुसरा अध्यक्ष
सातारा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे पक्षाला अवघ्या वर्षातच अध्यक्ष बदलावा लागला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता बाळासाहेब सोळसकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे काही दिवसांतच पक्षाला नवीन जिल्हाध्यक्ष मिळालेला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार हे महायुतीबरोबर गेले. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपदही मिळाले. त्यानंतर सातारा जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. मागील वर्षभर ते जिल्हाध्यक्षपदी होते. पण, १० दिवसांपूर्वीच फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीचा नवीन अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले होते.
बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव तालुक्यातील बाळासाहेब सोळसकर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोळस्कर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.