साताऱ्यात सिलेंडरच्या स्फोटात बेकरीस आग; लाखोंचे नुकसान

By दत्ता यादव | Updated: August 25, 2022 15:26 IST2022-08-25T15:25:36+5:302022-08-25T15:26:11+5:30

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही

Bakery fire in Satara due to cylinder explosion | साताऱ्यात सिलेंडरच्या स्फोटात बेकरीस आग; लाखोंचे नुकसान

साताऱ्यात सिलेंडरच्या स्फोटात बेकरीस आग; लाखोंचे नुकसान

सातारा:  येथील मोळाचा ओढा परिसरातील तामजाइनगरातील घोरपडे बेकरीजमधील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे बेकरीला आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, तामजाइनगरमधील रुद्राक्ष रेसिडेन्सीमध्ये घोरपडे बेकरीज आहे. या बेकरीमध्ये गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. यावेळी अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याने बेकरीतील महिला कामगारांसह इतर कामगारांनी बेकरीच्या बाहेर धाव घेतली. मोठा आवाज झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

स्फोटामुळे बेकरीतील किचनला आग लागली. आगीचे लोट बाहेर येत होते. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने सातारा पालिकेच्या अग्निशामक दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यानंतर स्फोट झालेला सिलेंडर बाहेर काढण्यात आला. तेव्हा बेकरीतील कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

Web Title: Bakery fire in Satara due to cylinder explosion