ZP Election: सातारा जिल्ह्यात झेडपीच्या एका गटासाठी सरासरी ३३,७१३ मतदार; सर्वाधिक गटांची संख्या कोणत्या तालुक्यात..वाचा
By नितीन काळेल | Updated: November 28, 2025 15:41 IST2025-11-28T15:39:39+5:302025-11-28T15:41:10+5:30
निवडणूक आयोगाकडील माहिती : ६५ गट अन् पंचायत समितीच्या १३० गणांसाठी निवडणूक

ZP Election: सातारा जिल्ह्यात झेडपीच्या एका गटासाठी सरासरी ३३,७१३ मतदार; सर्वाधिक गटांची संख्या कोणत्या तालुक्यात..वाचा
नितीन काळेल
सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लवकरच होत असल्याने सातारा जिल्ह्यातील एकूण ६५ गट आणि १३० गणांसाठी मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण २१ लाख ९१ हजारांवर मतदार राहणार आहेत. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार एका गटासाठी सरासरी ३३ हजार ७१३ मतदार राहणार आहेत.
राज्यातील बहुतांशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपून पावणेचार वर्षे होऊन गेली आहेत. सध्या या संस्थांवर प्रशासकीय राजवट आहे. आता तब्बल पावणेनऊ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीही निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची अंतिम रचनाही झाली आहे. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींसह गट आणि गणांचेही आरक्षण निश्चित झाले आहे. आता फक्त निवडणुकीची घोषणा होणे बाकी आहे.
कराड तालुक्यात सर्वाधिक १२ गट..
सातारा जिल्हा परिषदेसाठी एकूण ६५ गट आहेत. सर्वाधिक गटांची संख्या कराड तालुक्यात १२ आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात फक्त दोनच गट आहेत. तर पंचायत समितीचे १३० गण आहेत. या गट आणि गणांतील मतदारांची संख्या प्रारूप यादीनुसार प्रशासनाकडून समोर आलेली आहे. यामध्ये एकूण २१ लाख ९१ हजार ३७४ मतदार आहेत.
पुरुष मतदार ११ लाखांवर...
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदारांची संख्या पुरुषांची आहे. प्रारूप मतदार यादीनुसार ही संख्या ११ लाख ११ हजार ८५४ इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या १० लाख ७९ हजार ४६० आहे. त्याचबरोबर इतर मतदारांची संख्या ६० आहे.
तालुकानिहाय गट अन् गण संख्या
- महाबळेश्वर - ०२ - ०४
- वाई - ०४ - ०८
- खंडाळा - ०३ - ०६
- फलटण - ०८ - १६
- माण - ०५ - १०
- खटाव - ०७ - १४
- कोरेगाव - ०६ - १२
- सातारा - ०८ - १६
- जावळी - ०३ - ०६
- पाटण - ०७ - १४
- कराड - १२ - २४
१७ ते ४३ हजारांपर्यंत मतदार एका गटात...
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाटण तालुक्यातील एका गटात सर्वाधिक मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार संख्या महाबळेश्वर तालुक्यातील गटात राहणार आहे. जिल्ह्यातील गटांतील मतदारांचा विचार करता १७ हजार ते ४३ हजारांपर्यंत एका गटात मतदार राहणार आहेत.
सातारा जिल्हा आठव्या स्थानी...
निवडणूक आयोगाकडील माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या एका गटासाठी सातारा जिल्ह्यात ३३ हजार ७१३ मतदार असतील. तर राज्यात बीडमध्ये सर्वाधिक ५७ हजार ५६७, पुणे जिल्हा ४० हजार ८३३ मतदार राहणार आहेत. या यादीत सातारा जिल्हा आठव्या स्थानी असणार आहे.