Satara: रहिमतपुरातील २० शासकीय कार्यालयांनी मिळकत कर थकवला, नगरपरिषद हतबल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:14 IST2026-03-25T19:12:05+5:302026-03-25T19:14:44+5:30
कार्यालयांकडून ‘तारीख पे तारीख’; जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार

Satara: रहिमतपुरातील २० शासकीय कार्यालयांनी मिळकत कर थकवला, नगरपरिषद हतबल
जयदीप जाधव
रहिमतपूर : रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील सुमारे २० शासकीय कार्यालयांनी चालू व थकीत रकमेसह सुमारे १७ लाख रुपयांचा मिळकत कर थकवला आहे. शासकीय कार्यालयांकडून पैसे भरण्यास ‘तारीख पे तारीख’ दिली जात असल्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे.
मालमत्ता कर हा नगरपरिषदेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहे. रहिमतपूर नगरपरिषदेमार्फत २०२५-२०२६ या आर्थिक वर्षातील वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. रहिमतपूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये शासकीय व निमशासकीय विभागात सुमारे २० शासकीय कार्यालये आहेत. यामधील बहुतेक शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या इमारतींचा मिळकत कर थकीत आहे. शासकीय इमारतींच्या थकीत करामुळे प्रत्येक वर्षी एकूण मागणीमध्ये वाढ होत आहे; परंतु वसुली होत नसल्याने वसुली उद्दिष्ट साध्य करणे पालिका प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे.
पथक वसुलीला गेल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टोलवाटोलवी केली जात आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकीत असलेल्या शासकीय कार्यालयांची यादीच जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पाठवली आहे.
थकीत कार्यालयांची नावे
- वीज वितरण : १, ६८,४९०
- महसूल कार्यालय व मंडल कार्यालय : ८०,४२०
- जिल्हा परिषद दवाखाना : ४५,२१०
- प्राथमिक आरोग्य केंद्र : ४२,२०४
- सरकारी धान्य गोडावून : १,८८,३७९
- सहायक अभियंता श्रेणी-१ उरमोडी : ७,८५३
- पशुवैद्यकीय दवाखाना : ५७,०५८
- जिल्हा परिषद स्टोअर रूम : ८०,८७५
- कार्यकारी अभियंता धोम कृष्णानगर-सातारा : ३,४९,९६९
- कार्यकारी अभियंता धोम-सातारा : १,२३,२०८
- डेड हाऊस : ६,६५४
- जिल्हा परिषद शाळा-१ : २,३७,६८७
- जिल्हा परिषद शाळा-२ : १,७४,६९७
- जिल्हा परिषद शाळा बेघरवस्ती : १०,३८४
- जिल्हा परिषद शाळा कोंडवली-परतवडी : २४,८६४
- उर्दू शाळा : ६,५९२
- नहरवाडी शाळा : ३,४५६ रुपये
कारवाईची हूल..थकबाकीदारांनी दांडलले
रहिमतपूर पालिका हद्दीतील थकबाकीदारांनी थकीत करांचा तत्काळ भरणा न केल्यास थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात तसेच होर्डिंग्जवरती सार्वजनिक करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी दिला होता; परंतु अद्याप एकाही थकबाकीदाराचे नाव वर्तमानपत्रात तसेच होर्डिंग्जवर सार्वजनिक करण्यात आले नाही. नळ कनेक्शन कट करणे, मालमत्ता सील करण्याचे अधिकार पालिका प्रशासनाला आहेत. परंतु कारवाई न करता कार्यालयात बसून कारवाईची केवळ हूल दाखवणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचा इशारा थकबाकीदारांनी कर न भरून दांडलला असल्याची चर्चा रहिमतपुराची सुरू आहे.