सातारा जिल्हा परिषदेत ‘नारीशक्ती’, महिला अधिकाऱ्यांनी उमटवला कार्याचा ठसा

By नितीन काळेल | Published: February 6, 2024 07:13 PM2024-02-06T19:13:18+5:302024-02-06T19:13:48+5:30

सातारा : प्रशासनात महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्हा परिषदेतही महिला राज आले आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ...

Appreciable work of women officers in Satara Zilla Parishad | सातारा जिल्हा परिषदेत ‘नारीशक्ती’, महिला अधिकाऱ्यांनी उमटवला कार्याचा ठसा

सातारा जिल्हा परिषदेत ‘नारीशक्ती’, महिला अधिकाऱ्यांनी उमटवला कार्याचा ठसा

सातारा : प्रशासनात महिला अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्हा परिषदेतहीमहिला राज आले आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाल्याने जिल्हा परिषदेत आता ७ महिला अधिकारी झाल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेच्या ४० टक्क्यांहून अधिक विभागांचा कारभार ‘नारीशक्ती’च्या हाती आला असून त्यांनी कार्याचा ठसाही उमटवलाय.

प्रशासनात पूर्वी पुरुष अधिकाऱ्यांची संख्या अधिक दिसत होती. पण, १० वर्षांपासून महिला अधिकारीही मोठ्या संख्येने प्रशासनात आल्या आहेत. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्या प्रशासनात येत आहेत. तसेच जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, वन आदींसह विविध विभागात कार्यरत राहून कर्तबगारीही गाजवत आहेत. अशाचप्रकारे सातारा जिल्ह्यातील विविध विभागात आज महिला अधिकारी कार्यरत आहेत. तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे महिला अधिकारी विराजमान झाल्या होत्या.

मात्र, ६० वर्षांच्या इतिहासात सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नव्हती. पण, राज्य शासनाने सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदल्या केल्या. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी याशनी नागराजन यांची नियुक्ती केली. त्यामुळे जिल्हा परिषदेतही प्रथमच एक महिला मुख्य कार्यकारी अधिकारी झाली आहे.

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्हा परिषदेत ‘नारीशक्ती’ दिसून येणार आहे. कारण, जिल्हा परिषदेत तब्बल ७ महिला अधिकारी असणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अर्चना वाघमळे आहेत. मागील सवा दोन वर्षाहून अधिक काळ त्या विभागाचा कारभार पाहत आहेत. महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहिणी ढवळे यांची नियुक्ती झालेली आहे. मागील दोन वर्षांपासून त्या कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी शबनम मुजावर या आहेत.

समाजकल्याण विभागाचा कारभारही महिला अधिकाऱ्याच्या हाती आहे. डाॅ. सपना घोळवे या दोन वर्षांपासून जिल्हा समाजकल्याण अधिकारी आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी प्रभावती कोळेकर सुमारे दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्या सातारा जिल्हा परिषदेतच प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी कार्यरत होत्या. पाणी व स्वच्छता विभागाची धुरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे या पाहत आहेत. मागील वर्षापासून त्यांनी या विभागाचा पदभार स्वीकारलेला आहे.

तीन महिला अधिकारी साताऱ्यातील; ढवळे यांचे सासर जिल्ह्यात..

सातारा जिल्हा परिषदेतील ७ पैकी तीन महिला अधिकारी या साताऱ्याच्या आहेत. अर्चना वाघमळे या सातारा तर क्रांती बोराटे जावळी तालुक्यातील आहेत. त्याचबरोबर शिक्षणाधिकारी शबनम मुजावर या खटाव तालुक्यातील एनकूळ गावच्या आहेत. तसेच खटाव तालुक्यातीलच अंबवडे हे त्यांचे सासर आहे. महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांचे सासर सातारा आहे.

Web Title: Appreciable work of women officers in Satara Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.