जोरदार पाऊसामुळे म्हसवडमध्ये पुरातन मंदिर ढासळले एकजण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 22:21 IST2021-09-06T22:21:13+5:302021-09-06T22:21:43+5:30
विरकरवाडीतील घटना; तीन मजूर गंभीर जखमी

जोरदार पाऊसामुळे म्हसवडमध्ये पुरातन मंदिर ढासळले एकजण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जोरदार पाऊस आल्याने आडोशाला उभ्या राहिलेल्या चार कामगारांच्या अंगावर पुरातन मंदिर कोसळल्याने परभणी जिल्ह्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना माण तालुक्यातील म्हसवड शेजारील विरकरवाडीमध्ये सोमवारी दुपारी चारवाजता घडली.
वेंकट बिराजी दणकटवड (वय ६५, रा. तांदूळवाडी, ता. पालम, जि. परभणी) असे मंदिराखाली सापडून मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विरकरवाडी येथे मायाक्काचे नवीन मंदिर बांधण्याचे काम सुरू आहे. याच मंदिराच्या शेजारी पुरातन मायाक्काचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम सुरु असताना सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. मंदिराच्या बांधकामांवर काम करणारे आठ कामगार नजिकच जुने मायाक्का देवीच्या मंदिराच्या आडोशाला गेले. जुने असलेले मायाक्काचे मंदिर हे शहाबाद फरशीचे गरडेल असलेले अचानक कोसळले. यामध्ये चार मजूर गाडले गेले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. मंदिर पडल्याचा मोठा आवाज होताच गावांतील नागरिक मंंदिराच्या दिशेने पळाले. मंदिराच्या मलब्यात पिराजी कोळी (वय २२, भंडारकोवढे सोलापूर), महेश भोई (वय २३, रा. सोलापूर), उद्धव गंगाराम गुंडवड (वय ५०, तांदुळवाडी, परभणी) हे तिघे अडकले.
या मजुरांना भरपावसात ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर अर्ध्या तासानंतर या मजुरांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना म्हसवड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वेंकट दणकटवड यांचा मृत्यू झाला. या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.