साताऱ्यात वीज तोडायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला वृध्दाची धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 13:50 IST2026-02-19T13:49:30+5:302026-02-19T13:50:21+5:30
एकाच आडनावावरुन झालेल्या गैरसमजातून प्रकार

संग्रहित छाया
सातारा : वीजबिल थकीत असल्याने वीज वितरणच्या महिला टेक्निशियन वीज कनेक्शन तोडायला इमारतीजवळ गेल्या. पण एकाच नावाच्या दोन आडनावांमुळे गैरसमज झाला अन् पुढे भलतंच घडलं. आमची लाईट कट करायला आल्याचा गैरसमज करून वृद्धाने महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार समर्थ मंदिर येथील रवी पार्क अपार्टमेंटमध्ये दि. १७ रोजी दुपारी २ वाजता घडला.
शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, समर्थ मंदिर येथील रवी पार्क अपार्टमेंटमधील पवार नामक व्यक्तीने वीजबिल थकवल्याने वीज वितरणच्या टेक्निशियन प्रियांका खाडे (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा) या तेथे गेल्या होत्या. अपार्टमेंटजवळ गेल्यानंतर तेथे शत्रुघ्न पवार (वय ६६) उभे होते. त्यांनी खाडे यांना विचारले, कशासाठी आला आहात. तेव्हा प्रियांका खाडे यांनी पवार यांनी वीजबिल थकवले आहे. त्यांची लाईट कट करायला आले आहे, असे सांगितले.
यावर संतप्त होऊन पवार बोलू लागले. ‘आम्ही वीजबिल भरले आहे. तुम्ही आमची लाईट कट करूनच दाखवा,’ असं म्हणत त्यांच्या अंगावर धावून गेले. तसेच शिवीगाळ, धक्काबुक्की केली. हा वाद गैरसमजुतीमधून झाला. वास्तविक एकाच इमारतीमध्ये पवार आडनावाची दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रियांका खाडे यांना दुसऱ्या पवारांची लाईट वीज तोडायची होती. परंतु, शत्रुघ्न पवार यांना त्यांची वीज तोडायला आल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे पुढे वाद वाढला.
अखेर वीज तोडली
या वादानंतर खाडे यांनी ज्या पवारांची लाईट कट करायची होती, ती लाईट कट केली. परंतु, गैरसमजुतीतून हा वाद झाल्याने हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला. खाडे यांच्या तक्रारीवरून शत्रुघ्न पवार यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हवालदार संदीप मदने हे अधिक तपास करत आहेत.