Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता
By प्रमोद सुकरे | Updated: April 28, 2025 18:03 IST2025-04-28T18:03:05+5:302025-04-28T18:03:25+5:30
..तर मंत्री गोरेंनाही झळा बसतील

Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता
प्रमोद सुकरे
कऱ्हाड: सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे ४ आमदार आहेत पैकी २ मंत्री आहेत. शिवसेनेचे २ आमदार आहेत पैकी १ मंत्री आहेत. तर राष्ट्रवादी चे २ आमदार आहेत पैकी एक मंत्री आहेत. पण आता राष्ट्रवादीने जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करायला सुरुवात केल्याने विरोधकांच्या बरोबर महायुतीतील घटक पक्षांना देखील आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागल्याच्या चर्चा आहेत.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण आता 'घड्याळा घालून' बरेच पाणी गेले आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे राष्ट्रवादीची ताकद आता जिल्ह्यात दिसत नाही. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात २ आमदार असले तरी दुसरा आमदार फक्त बेरजेचा धनी आहे हे सगळ्यांनाच ठावूक आहे.
अशा सगळ्या परिस्थितीत अलीकडच्या काळात सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव प्राप्त करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलेच लक्ष घातलेले दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच कराडातील अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या राष्ट्रवादीत झालेल्या पक्षप्रवेशाकडे पाहिले जाते.
आतातर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाच्या चर्चा जोरात सुरू झालेल्या आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर काही मातब्बरही उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अजित पवारांची पक्ष वाढीसाठी चालवलेली चाचपणी,त्याला मिळत असलेला प्रतिसाद पाहून घड्याळाचे काटे आता अनेकांना बोचू लागले आहेत हे आता लपून राहिलेले नाही .
म्हणे जिल्हा राष्ट्रवादीमय करुया ..
नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सातारा जिल्हा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी एका दिवसात ३ कार्यक्रम केले. या तिन्ही कार्यक्रमात बोलताना त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी पुन्हा वाढवूया असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच आमदारकीचा आकडा समसमान करा जिल्ह्याला राष्ट्रवादीचा पालकमंत्री देतो असे सुतोवाचही त्यांनी एका कार्यक्रमात केले .त्यांचे हे सुतोवाच अनेकांना काटा टोचल्यासारखेच मानले जातेय.
त्याचा तीन विधानसभा मतदारसंघावर परिणाम
अँड. उदयसिंह पाटील उंडाळकर हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात येत असले तरी त्यांच्या पक्षप्रवेशाचा कराड दक्षिण सह नजीकच्या कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघांमध्येही परिणाम होणार आहे. कारण त्यांच्या रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आणि ते या तिन्ही विधानसभा मतदारसंघात विखुरलेले आहेत .
दक्षिणेत आजी माजी आमदारांची डोकेदुखी वाढणार
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपने परिवर्तनाचे कमळ फुलवले आहे. अशा परिस्थितीत अँड.उदयसिंह पाटील यांनी केलेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश आजी- माजी आमदारांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
विशेषतः माजी आमदारांना त्रास
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात ५ तालुक्यातील थोड्या थोड्या गावांचा समावेश आहे. मात्र त्यात कराड तालुक्यातील मतदान सर्वाधिक आहे. येथील अँड. उदयसिंह पाटील यांना मानणाऱ्या रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. येथे देखील विशेषतः माजी आमदारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
पाटणकर गटासाठी फायद्याचे नाही
कराड तालुक्यातील एका जिल्हा परिषद गटात गटाचा समावेश पाटण विधानसभा मतदारसंघात आहे. या मतदारसंघात अँड. उदयसिंह पाटील यांच्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यांनी आता नेत्यांबरोबर हातात घड्याळ बांधले आहे.त्यामुळे पाटणच्या राजकारणावर त्याचा परिणाम होणार आहे. मात्र येथील शिवसेनेचे आमदार, विद्यमान मंत्री शंभूराज देसाई हे उंडाळकरांचे साडू असलेने त्याची विशेष झळ त्यांना पोहोचेल असे वाटत नाही. मात्र पाटणकर गटासाठी मात्र हे निश्चितच फायद्याचे नाही.
तर मंत्री गोरेंनाही झळा बसतील
माण तालुक्यातील युवा नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई , माजी आमदार प्रभाकर घार्गे यांची देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा सुरू आहे.त्याला जर मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले तर येथील आमदार, मंत्री जयकुमार गोरे यांना त्याच्या झळा बसतील असेही बोलले जात आहे.