अजित पवार चांगले विरोधी पक्षनेते, पण..; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 21:12 IST2023-06-23T20:57:22+5:302023-06-23T21:12:07+5:30
मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, विरोधी पक्षनेतेपदाबद्दल त्यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं

अजित पवार चांगले विरोधी पक्षनेते, पण..; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार भाषण केलं. पक्षाच्या व्यासपीठावरुन, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांच्या समोरच अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे म्हटले. तसेच, मला पक्ष संघटनेत कुठलीही जबाबदारी द्या, अशी इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या भाषणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, विरोधी पक्षनेतेपदाबद्दल त्यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केलं. मुख्यमंत्री सध्या सातारा जिल्हा दौऱ्यावर असून मागील तीन दिवसापासून त्यांच्या दरे या गावी मुक्कामी आहेत. मुख्यमंत्र्यांनी धरणातील पाणीसाठी कमी झाल्याबाबत आज त्यांच्या दरे गावातील निवासस्थानी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी, अजित पवारांबद्दल विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.
'माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, ते चांगले विरोधी पक्षनेते आहेत. पण, हा त्यांचा हा अंतर्गत विषय आहे, कदाचित त्यांची कुचंबांना झाली असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच 'महाराष्ट्राला सर्व गोष्टी माहिती आहेत. जनता सुज्ञ आहे', असंदेखील ते म्हणाले.
विरोधी एकजुटीवर केली टीका
सर्वपक्षीय विरोधी नेत्यांची पाटण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केलीय. असे सर्वजण बऱ्याचदा २०१४, २०१९ मध्ये एकत्र आले आहेत. मोदींविरुद्ध सर्वजण एकवटले असले तरी त्यांच्यामध्ये एकमत दिसत नाहीत. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. ज्यावेळी त्यांनी मोदींवर टीका केली तेवढं त्यांचं महत्त्व वाढत गेलंय. कोणी कितीही प्रयत्न केले तरी २०२४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच पूर्ण ताकदीचं सरकार स्थापन होणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
मुख्यमंत्री शिंदेंवर अजित पवारांची टीका
मुलींच्या वसतिगृहात मुलीची झालेली हत्या, चालत्या ट्रेनमध्ये मुलीवर झालेल्या अत्याचार, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रियकराने प्रेयसीची केलेली हत्या या घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला छेद देणाऱ्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही, बेरोजगारी, महिला अत्याचार याबाबत काहीच बोलायला तयार नाही. याउलट ते आपल्या पक्षाला बदनाम करायचा प्रयत्न करतात. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात तुम्ही माझ्यावर फार टीका करता?, अहो तुम्ही नुसतीच दाढी कुरवळत बसता, मग टीका करू नायतर काय करू, तुम्ही रिझल्ट द्या ना, मग तुमचं कौतुक करेल, असे म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
काय म्हणाले होते अजित पवार
मला विरोधी पक्षनेतेपदात विशेष रस नव्हता. मात्र, आमदारांचा आग्रह आणि वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यामुळे मी ते पद स्वीकारले. पण आता बस झाले, मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, असे बोलत थेट विरोधी पक्षनेतेपदावरून मुक्त करण्याची मागणी अजित पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.