हाय व्होल्टेज ड्रामानंतर ऑपरेशन लोटस यशस्वी; सातारा झेडपीत अध्यक्षपदी प्रिया शिंदे, भोसले उपाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:21 IST2026-03-21T12:21:10+5:302026-03-21T12:21:23+5:30
यावेळी झालेल्या वादात शिंदेसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दुखापत झाली. अध्यक्ष, उपाध्यक्षांना ३३ तर विरोधी उमेदवारांना ३० मते मिळाली.

हाय व्होल्टेज ड्रामानंतर ऑपरेशन लोटस यशस्वी; सातारा झेडपीत अध्यक्षपदी प्रिया शिंदे, भोसले उपाध्यक्ष
सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या प्रचंड चुरशीने झालेल्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी (अजित पवार)चे तीन व शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडून ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी केले. त्यासाठी शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डाॅ. प्रिया शिंदे यांना ऐनवेळी अध्यक्षपदी व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड केली. यावेळी झालेल्या वादात शिंदेसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दुखापत झाली. अध्यक्ष, उपाध्यक्षांना ३३ तर विरोधी उमेदवारांना ३० मते मिळाली.
भाजपने २७ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) २० आणि शिंदेसेनेने १५, काॅंग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका जागेवर विजय मिळवला; एक अपक्षही विजयी झाला. या अपक्षाने भाजपला पाठिंबा दिला.
दोन सदस्य ताब्यात -
राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेकडे ३५ सदस्यांचे बहुमत असल्याने भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ राबवले. मतदानापूर्वी सभागृहामध्ये चाललेल्या दोन विरोधी सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे पाच सदस्य फुटल्याने भाजपला बहुमताची ३३ मते मिळाली.
राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेला अडीच वर्षांच्या फार्म्युल्यावरून वरिष्ठ नेत्यांना विचारून सांगतो, असे सांगत रात्रभर वेटिंगवर ठेवले अन् त्याचवेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम सुरू केला. निवडीवेळी कडेकोट बंदोबस्तात आणूनही भाजपने पाच सदस्य पळवले.